Wednesday, April 27, 2016

ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओव्या ५७ ते १३०



ज्ञानेश्वरी / अध्याय नववा  राजविद्याराजगुह्ययोग  संत ज्ञानेश्वर
ओव्या ५७ ते १३०

     
अश्रद्दधाना: पुरुषा धर्मस्यास्य परंतप।
     
अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि ॥ ३ ॥

पाहें पां दूध पवित्र आणि गोड, पासीं त्वचेचिया पदराआड।
परि तें अव्हेरुनि गोचिड, अशुद्ध काय नेघती ॥ ५७ ॥

कां कमलकंदा आणि दर्दुरीं, नांदणुक एकेचि घरीं।
परि परागु सेविजे भ्रमरीं, जवळिलां चिखलुचि उरे ॥ ५८ ॥

दर्दुरीं=बेडूक

नातरी निदैवाचां परिवरीं, लोह्या रुतलिया आहाति सहस्त्रवरीं।
परि तेथ बैसोनि उपवासु करी, कां दरिद्रें जिये ॥ ५९ ॥

परिवरीं =घरी  लोह्या=सुवर्णमुद्रा

तैसा हृदयामध्यें मी रामु, असतां सर्वसुखाचा आरामु।
कीं भ्रांतासी कामु, विषयावरी ॥ ६० ॥

बहु मृगजळ देखोनि डोळां, थुंकिजे अमृताचा गिळितां गळाळा।
तोडिला परिसु बांधिला गळा, शुक्तिकालाभें ॥ ६१ ॥

गळाळा=घोट शुक्तिका =शिंपला

तैसीं अहंममतेचिये लवडसवडी, मातें न पवतीचि बापुडीं।
म्हणोनि जन्ममरणाची दुथडी, डहुळितें ठेलीं ॥ ६२ ॥

लवडसवडी=लगबगीत(दंग)  दुथडी=तटी  डहुळितें=गटांगळ्या खाती (गढूळणे)

एऱ्हवीं मी तरी कैसा, मुखाप्रती भानु कां जैसा।
कहीं नसे न दिसे ऐसा, वाणीचा नव्हें ॥ ६३ ॥

वाणीचा=न्यून कमीपणा कहीं नसे न दिसे ऐसा=(रात्र दिवस)

     
मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना।
     
मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थित: ॥ ४ ॥

माझेया विस्तारलेपणाचेनि नांवें, हे जगचि नोहे आघवें।
जैसें दूध मुरालें स्वभावें , तरि तेंचि दहीं ॥ ६४ ॥

कां बीजचि जाहलें तरु, अथवा भांगारचि अळंकारु।
तैसा मज एकाचा विस्तारु, तें हें जग ॥ ६५ ॥

हें अव्यक्तपणें थिजलें, तेंचि मग विश्वाकारें वोथिजलें।
तैसें अमूर्तमूर्ति मियां विस्तारलें, त्रैलोक्य जाणें ॥ ६६ ॥

वोथिजलें=पातळ झाले

महदादि देहांतें, इयें अशेषेंही भूतें।
परि माझां ठायीं बिंबते, जैसे जळीं फेण ॥ ६७ ॥

परि तया फेणांआंतु पाहतां, जेवीं जळ न दिसे पंडुसुता।
नातरी स्वप्नींची अनेकता, चेइलिया नोहिजे ॥ ६८ ॥

तैसीं भूतें इयें माझां ठायीं, बिंबती तयांमाजी मी नाहीं।
इया उपपत्ती तुज पाहीं, सांगितलिया मागां ॥ ६९ ॥

म्हणऊनि बोलिलिया बोलाचा आतिसो, न कीजे यालागीं हें असो|
तरी मजआंत पैसो, दिठि तुझी ॥ ७० ॥

आतिसो=विस्तार

आमचा प्रकृतीपैलीकडील भावो, जरी कल्पनेवीण लागसी पाहों।
तरी मजमाजि भूतें हेंही वावो, जे मी सर्व म्हणऊनि ॥ ७१ ॥

एऱ्हवीं संकल्पाचिये सांजवेळे, नावेक तिमिरेजती बुद्धीचे डोळे, |
म्हणोनि अखंडित परि झांवळें, भूतभिन्न ऐसें देखें ॥ ७२ ॥

नावेक=क्षणभर   झांवळें= धूसर प्रकाश

तेचि संकल्पाची सांज जैं लोपे, तैं अखंडितचि आहे स्वरुपें।
जैसें शंका जातखेंवो लोपे, सापपण माळेचें ॥ ७३ ॥

एऱ्हवीं तरी भूमीआंतूनि स्वयंभ, काय घडेगाडगेयांचे निघती कोंभ |
परि ते कुलालमतीचे गर्भ, उमटले कीं ॥ ७४ ॥
कुलाल=कुंभार गर्भ=कल्पना

नातरी सागरींचां पाणीं, काय तंरगाचिया आहाती खाणी।
ते अवांतर करणी, वारयाची नव्हे ॥ ७५ ॥

पाहें पां कापसाचां पोटीं, काय कापडाची होती पेटी।
तो वेढितयाचिया दिठी, कापड जाहला ॥ ७६ ॥

वेढितयाचिया=नेसणारा

जरी सोनें लेणें होऊनि घडे, तरी तयाचें सोनेपण न मोडे।
येर अळंकार हे वरचिलीकडे, लेतयाचेनि भावें ॥ ७७ ॥

सांगें पडिसादाची प्रत्युत्तरें, कां आरिसां जें आविष्करे।
तें आपलें कीं साचोकारें, तेथेंचि होतें ॥ ७८ ॥

साचोकारें=खरोखर

तैसी इये निर्मळे माझां स्वरुपीं, जो भूतभावना आरोपी।
तयासी तयाचां संकल्पीं, भूताभासु असे ॥ ७९ ॥

तेचि कल्पिती प्रकृती पुरे, आणि भूताभासु आधींच सरे।
मग स्वरुप उरे एकसरें, निखळ माझें ॥ ८० ॥

हें असो आंगीं भरलिया भवंडी, जैशा भोंवत दिसती अरडीदरडी |
तैशी आपुलिया कल्पना अखंडीं, गमती भूतें ॥ ८१ ॥

भवंडी =भोवळ अरडीदरडी= भिंती/परिसर  

तेचि कल्पना सांडूनि पाहीं, तरि मी भूतीं भूतें माझिया ठायीं।
हें स्वप्नींही परि नाहीं, कल्पावयाजोगें ॥ ८२ ॥

आतां मी एक भूतातें धर्ता, अथवा भूतामाजि मी असता।
या संकल्पसन्निपाता, आंतुलिया बोलिया ॥ ८३ ॥

सन्निपाता=तापातील मधला बोल

म्हणोनि परियेसीं गा प्रियोत्तमा, यापरी मी विश्वेंसीं विश्वात्मा।
जो इया लटकिया भूतग्रामा, भाव्यु सदा ॥ ८४ ॥

भाव्यु=जन्मदाता

रश्मीचेनि आधारें जैसें, नव्हतेंचि मृगजळ आभासे।
माझां ठायीं भूतजात तैसें, आणि मातेंही भावीं ॥ ८५ ॥

मी ये परीचा भूतभावनु , परि सर्व भूतांसि अभिन्नु।
जैसी प्रभा आणि भानु, एकचि ते ॥ ८६ ॥

हा आमचा ऐश्वर्ययोगु, तुंवा देखिला कीं चांगु।
आतां सांगें कांहीं एथ लागु, भूतभेदाचा असे ॥ ८७ ॥

यालागीं मजपासूनि भूतें , आनें नव्हती हें निरुतें।
आणि भूतावेगळिया मातें, कहींच न मनीं हो, ८८ ॥

     
यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान्।
     
तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय ॥ ६ ॥

पैं गगन जेवढें जैसें, पवनु गगनीं तेवढाचि असे।
सहजें हालविलिया वेगळा दिसे, एऱ्हवीं गगन तेंचि ते ॥ ८९ ॥

तैसें भूतजात माझां ठायीं, कल्पिजे तरी आभासें कांहीं।
निर्विकल्पीं तरि नाहीं, तेथ मीच मी आघवे ॥ ९० ॥

म्हणऊनि नाहीं आणि असे, हें कल्पनेचेनि सौरसें।
जे कल्पनालोपें भ्रंशें, आणि कल्पनेसवें होय।। ९१ ॥

तेंचि कल्पितें मुदल जाये, तैं असें नाहीं हें कें आहे।
म्हणऊनि पुढती तूं पाहें, हा ऐश्वर्ययोगु ॥ ९२ ॥

ऐसिया प्रतीतिबोधसागरीं, तूं आपणपेयातें कल्लोळु एक करीं।
मग जंव पाहासी चराचरीं, तंव तूचि आहासी ॥ ९३ ॥

या जाणणेयाचा चेवो, तुज आला ना म्हणती देवो।
तरी आतां द्वैतस्वप्न वावो, जालें कीं ना ॥ ९४

चेवो=जाग  वावो=अंत

तरी पुढती जरी विपायें, बुद्धीसि कल्पनेची झोंप ये।
तरी अभेदबोधु जाये, जैं स्वप्नीं पडिजे ॥ ९५ ॥

म्हणोनि ये निद्रेची वाट मोडे, निखळ उद्बोधाचेंचि आपणपें घडे।
ऐसें वर्म जें आहे फुडें, तें दावो आतां ॥ ९६ ॥

उद्बोधाचेंचि=ज्ञान

तरी धनुर्धरा धैर्या, निकें अवधान देईं बा धनंजया।
पैं सर्व भूतांतें माया, करि हरि गा ॥ ९७ ॥

     
सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम्।
     
कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् ॥ ७ ॥

जिये नांव गा प्रकृती, जे द्विविध सांगितली तुजप्रती।
एकी अष्टधा भेदव्यक्ती, दुजी जीवरुपा।। ९८ ॥

हा प्रकृतीविखो आघवा, तुंवा मागां परिसिलासे पांडवा।
म्हणोनि असो काइ सांगावा, पुढतपुढती ॥ ९९ ॥

 विखो=विषय

तरी ये माझिये प्रकृती, महाकल्पाचां अंती।
सर्व भूतें अव्यक्तीं, ऐक्यासी येती।। १०० ॥

ग्रीष्माचां अतिरसीं, सबीजे तृणें जैसीं।
मागुती भूमीसी, सुलीनें होती ॥ १०१ ॥

अतिरसीं=अति प्रखर सुलीनें=मिसळतात

कां वार्षिये ढेंढें फिटे, जेव्हां शारदीयेचा अनुघडु फुटे।
तेव्हां घनजात आटे, गगनींचें गगनीं ॥ १०२ ॥

ढेंढें =प्रस्थ    अनुघडु फुटे = आरंभ होतो

नातरी आकाशाचिये खोंपे, वायु निवांतुचि लोपे।
कां तरंगता हारपे, जळीं जेवीं ॥ १०३ ॥

खोंपे=घरटे

अथवा जागिनलिये वेळे, स्वप्न मनींचें मनीं मावळे।
तैसें प्राकृत प्रकृती मिळे, कल्पक्षयीं ॥ १०४ ॥

प्राकृत=प्रकृती पासून झालेले

मग कल्पादीं पुढती, मीचि सृजीं ऐसी वदंती।
तरी इयेविषयीं निरुती, उपपत्ती आइक ॥ १०५ ॥

     
प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः।
     
भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात् ॥ ८ ॥

तरी हेचि प्रकृति किरिटी, मी स्वकीया सहजें अधिष्ठीं।
तेथ तंतु समवाय पटीं, जेविं विणावणी दिसे ॥ १०६

स्वकीया=स्वत:च्यामायेने    अधिष्ठीं=धारण करतो
समवाय =सारखी  विणावणी=विणकाम

मग तिये विणावणीचेनि आधारें, लहानां चौकडियां पटत्व भरे।
तैसी पंचात्मके आकारें, प्रकृतिचि होये ॥ १०७ ॥

जैसें विरजणियाचेनि संगें, दूधचि आटेजों लागे।
तैशी प्रकृति आंगा रिगे, सृष्टिपणाचिया ॥ १०८ ॥

बीज जळाचि जवळीक लाहे, आणि तेंचि शाखोपशाखीं होये।
तैसें मज करणें आहे, भूतांचे हें ॥ १०९ ॥

अगा नगर हें रायें केलें, या म्हणणया साचपण कीर आलें।
परि निरुतें पाहतां काय शिणले, रायाचे हात ॥ ११० ॥

आणि मी प्रकृति अधिष्ठीं तें कैसें, जैसा स्वप्नीं जो असे।
मग तोचि प्रवेशे, जागृतावस्थे ॥ १११ ॥

तरि स्वप्नौनि जागृती येतां, काय पाय दुखती पंडुसुता ।
कीं स्वप्नामाजीं असतां, प्रवासु होय ॥ ११२ ॥

या आघवियाचा अभिप्रावो कायी, जे हें भूतसृष्टीचें कांहीं।
मज एकही करणें नाहीं, ऐसाचि अर्थु ॥ ११३ ॥

अभिप्रावो=सारांश

जैशी रायें अधिष्ठिली प्रजा, व्यापारे आपुलालिया काजा।
तैसा प्रकृतिसंगु माझा, येर करणें तें इयेचें ॥ ११४ ॥

पाहें पां पूर्णचंद्राचिये भेटी, समुद्र भरतें अपार दाटी।
तेथ चंद्रासि काय किरीटी, उपखा पडे ॥ ११५ ॥

उपखा=श्रम

जड परि जवळिका, लोह चळे तरि चळो कां।
कवणु शीणु भ्रामका, सन्निधानाचा ॥ ११६ ॥

भ्रामका=लोहचुंबक

किंबहुना यापरी, मी निजप्रकृति अंगीकारीं।
आणि भूतसृष्टी एकसरी, प्रसवोंचि लागे ॥ ११७ ॥

जो हा भूतग्रामु आघवा, असे प्रकृतिआधीन पांडवा।
जैसी बीजाचिया वेलपालवा, समर्थ भूमि ॥ ११८ ॥

नातरि बाळादिकां वयसां, गोसावी देहसंगु जैसा।
अथवा घनावळी आकाशा, वार्षियें जेवीं ॥ ११९ ॥

कां स्वप्नासि कारण निद्रा, तैसी प्रकृति हे नरेंद्रा।
या अशेषाहि भूतसमुद्रा, गोसाविणी गा ॥ १२० ॥

स्थावरा आणि जंगमा, स्थूळा अथवा सूक्ष्मा।
हे असो भूतग्रामा, प्रकृतिचि मूळ ॥ १२१ ॥

म्हणोनि भूतें हन सृजावीं, कां सृजिलीं प्रतिपाळावीं।
इयें करणीं न येती आघवीं, आमुचिया आंगा ॥ १२२ ॥

जळीं चंद्रिकेचिया पसरती वेली, ते वाढी चंद्रे नाहीं वाढविली।
तेवि मातें पावोनि ठेलीं, दुरी कर्में ॥ १२३ ॥

     
न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय।
     
उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु ॥ ९ ॥

आणि सुटलिया सिंधुजळाचा लोटु, न शके धरुं सैंधवाचा घाटु।
तेवि सकळ कर्मा मीच शेवटु, ती काइ बांधती मातें ॥ १२४ ॥

सैंधवाचा=मीठ

धूम्ररजांची पिंजरी, वाजतिया वायुतें जरी होकारी।
कां सूर्यबिंबामाझारीं, आंधारे रिगे ॥ १२५ ॥

वाजतिया=जोराचा   होकारी=थांबवे

हें असो पर्वताचिये हृदयींचें, जेविं पर्जन्यधारास्तव न खोंचे।
तेविं कर्मजात प्रकृतीचें, न लगे मज ॥ १२६ ॥

खोंचे=खुपणे

एऱ्हवीं इये प्रकृतींविकारीं, एकु मीचि आहे अवधारीं।
परि उदासीनाचिया परि, करीं ना करवी ॥ १२७ ॥

दीपु ठेविला परिवरीं, कवणातें नियमी ना निवारी।
आणि कवण कवणिये व्यापारीं, राहाटे तेंहि नेणे ॥ १२८ ॥

तो जैसा का साक्षिभूतु, गृहव्यापारप्रवृत्तिहेतु।
तैसा भूतकर्मीं अनासक्तु, मी भूतीं असें ॥ १२९ ॥

हा एकचि अभिप्रावो पुढतपुढती, काय सांगो बहुतां उपपत्तीं |
येथ एकवेळां सुभद्रापती, येतुलें जाण पां ॥ १३० ॥


http://dnyaneshwariabhyas.blogspot.in/
==================  ===================  ===========

1 comment: