ज्ञानेश्वरी / अध्याय
नववा राजविद्याराजगुह्ययोग संत ज्ञानेश्वर
ओव्या ३४४
ते ४०६
येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता:।
तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् ॥ २३ ॥
आतां आणिकही संप्रदायें, परि मातें नेणती समवायें।
जे अग्नि-इंद्र-सूर्य-सोमाये, म्हणऊनि यजिती ॥ ३४४ ॥
संप्रदायें=समुदाय समवायें=सर्वसामान असणारा
तेंही कीर मातेंचि होये, कां जे हें आघवें मीचि आहें।
परि ते भजती उजरी नव्हे, विषम पडे ॥ ३४५ ॥
उजरी=सरळ विषम=वाकडे
पाहे पां शाखा पल्लव वृक्षाचे, हे काय नव्हती एकाचि बीजाचे।
परि पाणी घेणें मुळाचें, तें मुळींचि घापे ॥ ३४६ ॥
घापे=घालणे
कां दहाहीं इंद्रियें आहाती, इयें जरी एकेचि देहींचीं होती।
आणि इहीं सेविले विषयो जाती, एकाचि ठाया ॥ ३४७ ॥
तरि करोनि रससोय बरवी, कानीं केविं भरावी।
फुलें आणोनि बांधावीं, डोळां केविं ॥ ३४८ ॥
तो रसु तो मुखेंचि सेवावा, परिमळु तो घ्राणेंचि घ्यावा।
तैसा मी तो यजावा, मीचि म्हणोनि ॥ ३४९ ॥
येर मातें नेणोनि भजन, तें वायांचि गा आनेंआन।
म्हणोनि कर्माचे डोळे ज्ञान, तें निर्दोष होआवें ॥ ३५० ॥
आनेंआन=भलतेच दुसरेच काही
अहं हि
सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभूरेव च
न तु
मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च्यवान्ति ते ||२४||
एऱ्हवीं पाहें पां पंडुसुता, या यज्ञोपहारां समस्तां।
मीवांचूनि भोक्ता, कवणु आहे ॥ ३५१ ॥
मी सकळां यज्ञांचा आदि, आणि यजना या मीचि अवधि।
कीं मातें चुकोनि दुर्बुद्धि, देवां भजले ॥ ३५२ ॥
आदि =सुरुवात अवधि=शेवट
गंगेचे उदक गंगे जैसें, अर्पिंजे देवपित्तरोद्देशें।
माझे मज देती तैसें, परि आनानीं भावीं ॥ ३५३ ॥
म्हणऊनि ते पार्था, मातें न पवतीचि सर्वथा।
मग मनीं वाहिली जे आस्था, तेथ आले ॥ ३५४ ॥
यान्ति देवव्रता देवान्पितॄन्यान्ति पितृव्रता:।
भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम् ॥ २५ ॥
मनें वाचा करणीं, जयांचीं भजनें देवांचिया वाहणी।
ते शरीर जातियेक्षणीं, देवचि जाले ॥ ३५५ ॥
अथवा पितरांचीं व्रतें, वाहती जयांचीं चित्तें।
जीवित सरलिया तयांतें, पितृत्व वरी ॥ ३५६ ॥
कां क्षुद्रदेवतादि भूतें, तियेंचि जयांचीं परमदैवतें।
जींहीं अभिचारिकीं तयांतें, उपासिलें ॥ ३५७ ॥
तयां देहांची जवनिक फिटली, आणि भूतत्वाची प्राप्ती जाहली।
एवं संकल्पवशें फळलीं, कर्में तयां ॥ ३५८ ॥
जवनिक=पडदा
मग मीचि डोळां देखिला, जींहीं कानीं मीचि ऐकिला।
मनीं मी भाविला, वानिला वाचा ॥ ३५९ ॥
सर्वांगीं सर्वाठायीं, मीचि नमस्कारिला जिहीं।
दानपुण्यादिकें जें कांहीं, तें माझियाचि मोहरा ॥ ३६० ॥
जिहीं मातेंचि अध्ययन केलें, जे आंतबाहेर मियांचि धाले।
जयांचे जीवित्व जोडलें , मजचिलागीं ॥ ३६१ ॥
जे अहंकारु वाहत आंगीं, आम्ही हरीचे भूषावयालागीं।
जे लोभिये एकचि जगीं, माझेनि लोभें ॥ ३६२ ॥
जे माझेनि कामें सकाम, जे माझेनि प्रेमें सप्रेम।
जे माझिया भुली सभ्रम, नेणती लोक ॥ ३६३ ॥
जयांचीं जाणती मज शास्त्रें, मी जोडें जयाचेनि मंत्रें।
ऐसे जे चेष्टामात्रें, भजले मज ॥ ३६४ ॥
ते मरणाऐलीचकडे, मज मिळोनि गेले फुडे।
मग मरणीं आणिकीकडे, जातील केविं ॥ ३६५ ॥
म्हणोनि मद्याजी जे जाहाले, ते माझिया सायुज्या आले।
जिहीं उपचारमिषें दिधलें, आपणपें मज ॥ ३६६ ॥
मद्याजी=माझ्यामध्ये (आत्म समर्पण केले)
पैं अर्जुना माझां ठायीं , आपणपेवीण सौरसु नाहीं।
मी उपचारीं कवणाही, नाकळें गा ॥ ३६७ ॥
आपणपेवीण =आत्मानुभव सौरसु=आवड
एथ जाणिव करी तोचि नेणे, आथिलेंपण मिरवी तेंचि उणें।
आम्ही जाहलों ऐसें जो म्हणे, तो कांहींचि नव्हे ॥ ३६८ ॥
जाणिव =मज कळले असा भाव आथिलेंपण=असलेपण (ज्ञान )
अथवा यज्ञदानादि किरीटी, कां तपें हन जे हुटहुटी।
ते तृणा एकासाठीं, न सरे एथ ॥ ३६९ ॥
हुटहुटी=घमेंड
पाहें पां जाणिवेचेनि बळें, कोण्ही वेदापासूनि असे आगळें।
कीं शेषाहूनि तोंडागळें, बोलकें आथी ॥ ३७० ॥
जाणिवेचेनि=ज्ञानानुभती
तोही आंथरुणातळवटी दडे, येरु नेति नेति म्हणोनि बहुडे।
एथ सनकादिक वेडे, पिसे जाहले ॥ ३७१ ॥
बहुडे=मागे फिरतात
करितां तापसांची कडसणी, कवणु जवळां ठेविजैल शूळपाणी।
तोहि अभिमानु सांडूनि पायवणी, माथां वाहे ॥ ३७२ ॥
नातरी आथिलेपणें सरिसी, कवणी आहे लक्ष्मियेऐसी,
श्रियेसारिखिया दासी, घरीं जियेतें ॥ ३७३ ॥
आथिलेपणें=असलेपण ऐश्वर्य श्रिये= धनवैभव सामर्थ्य
तियां खेळतां करिती घरकुली, तयां नामें अमरपुरें जरि ठेविलीं,
तरि न होती काय बाहुलीं, इंद्रादिक तयांचीं ॥ ३७४ ॥
तयां नावडोनि जेव्हां मोडती, तेव्हां महेंद्राचे रंक होती।
तियां झाडां जेउते जयां पाहती, ते कल्पवृक्ष ॥ ३७५ ॥
ऐसें जियेचियां जवळिकां, सामर्थ्य घरींचियां पाइकां।
ते लक्ष्मी मुख्यनायका, न मनेचि एथ ॥ ३७६ ॥
मग सर्वस्वें करुनि सेवा, अभिमान सांडूनि पांडवा,
ते पाय धुवावयाचिया दैवा, पात्र जाहाली ॥ ३७७ ॥
म्हणोनि थोरपण पऱ्हांचि सांडिजे, व्युत्पत्ति आघवी विसरिजे।
जैं जगा धाकुटें होइजे , तैं जवळीक माझी ॥ ३७८ ॥
तयां नावडोनि जेव्हां मोडती, तेव्हां महेंद्राचे रंक होती।
तियां झाडां जेउते जयां पाहती, ते कल्पवृक्ष ॥ ३७५ ॥
ऐसें जियेचियां जवळिकां, सामर्थ्य घरींचियां पाइकां।
ते लक्ष्मी मुख्यनायका, न मनेचि एथ ॥ ३७६ ॥
मग सर्वस्वें करुनि सेवा, अभिमान सांडूनि पांडवा,
ते पाय धुवावयाचिया दैवा, पात्र जाहाली ॥ ३७७ ॥
म्हणोनि थोरपण पऱ्हांचि सांडिजे, व्युत्पत्ति आघवी विसरिजे।
जैं जगा धाकुटें होइजे , तैं जवळीक माझी ॥ ३७८ ॥
पऱ्हांचि =दूर पलीकडे व्युत्पत्ति=पांडित्य अभिमान
अगा सहस्त्रकिरणाचिये दिठी, पुढा चंद्रुही लोपे किरीटी।
तेथ खद्योत का हुटहुटी, आपुलेनि तेजें ॥ ३७९ ॥
हुटहुटी=घमेंड गर्व
तैसें लक्ष्मियेचें थोरपण न सरे, जेथ शंभूचेंही तप न पुरे।
तेथ येर प्राकृत हेंदरें, केविं जाणों लाहे ॥ ३८० ॥
हेंदरें,=वेडगळ अजागळ
यालागीं शरीर सांडोवा कीजे, सकळगुणांचें लोण उतरिजे,
संपत्तिमदु सांडिजे, कुरवंडी करुनी ॥ ३८१ ॥
सांडोवा=झिजवावे लोण उतरिजे= उतरवून टाकणे (उतारा )
कुरवंडी=ओवाळणी
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥ २६ ॥
मग निस्सीमभाव उल्हासें, मज अर्पावयाचेनि मिसें।
फळ आवडे तैसें, भलतयाचें हो ॥ ३८२ ॥
भक्तु माझियाकडे दावी, आणि मी दोन्ही हात वोडवीं।
मग देठुं न फेडितां सेवीं, आदरेंशी ॥ ३८३ ॥
पैं गा भक्तीचेनि नांवें , फूल एक मज द्यावें।
तें लेखें तरि म्यां तुरंबावें, परि मुखींचि घालीं ॥ ३८४ ॥
लेखें=विचार करता ,तसे पाहता
हें असो कायसीं फुलें, पानचि एक आवडे तें जाहलें।
तें साजुकही न हो सुकलें, भलतैसें ॥ ३८५ ॥
परि सर्वभावें भरलें देखें, आणि भुकेला अमृतें तोखे।
तैसें पत्रचि परि तेणें सुखें , आरोगूं लागें ॥ ३८६ ॥
अथवा ऐसेंही एक घडे, जे पालाही परि न जोडे।
तरि उदकाचें तंव सांकडें, नव्हेल कीं ॥ ३८७ ॥
सांकडें=कठीण
तें भलतेथ निमोलें, न जोडितां आहे जोडलें।
तेंचि सर्वस्व करुनि अर्पिलें, जेणें मज ॥ ३८८ ॥
निमोलें=मोल नसलेले फुकट
तेणें वैकुठापासोनि विशाळें, मजलागीं केलीं राऊळें।
कौस्तुभाहोनि निर्मळें, लेणीं दिधलीं ॥ ३८९ ॥
दूधाचीं शेजारें, क्षीराब्धीऐसीं मनोहरे।
मजलागीं अपारें, सृजिलीं तेणें ॥ ३९० ॥
शेजारें=बिछाना
कर्पूर चंदन अगरु, ऐसेया सुगंधाचा महामेरु।
मज हातीं लाविला दिनकरु, दीपमाळे ॥ ३९१ ॥
गरुडासारिखीं वाहनें, मज सुरतंरुचीं उद्यानें।
कामधेनूंचीं गोधनें, अर्पिलीं तेणें ॥ ३९२ ॥
मज अमृताहूनि सुरसें, बोनीं वोगरिलीं बहुवसें।
ऐसा भक्तांचेनि उदकलेशें, परितोषें गा ॥ ३९३ ॥
बोनीं=पक्वान्ने
हें सांगावें काय किरीटी, तुम्हींचि देखिलें आपुलिया दिठी।
मी सुदामयाचिया सोडीं गाठीं, पव्हयालागीं ॥ ३९४ ॥
पव्हयालागीं=पोह्यासाठी
पैं भक्ति एकी मी जाणें, तेथ सानें थोर न म्हणें।
आम्ही भावाचे पाहुणे, भलतेया ॥ ३९५ ॥
येर पत्र पुष्प फळ, तें भजावया मिस केवळ।
वांचूनि आमुचा लाग निष्फळ , भक्तितत्व ॥ ३९६ ॥
म्हणोनि अर्जुना अवधारीं, तूं बुद्धि एकी सोपारी करीं।
तरी सहजें आपुलिया मनोमंदिरीं, न विसंबें मातें ॥ ३९७ ॥
सोपारी=स्वाधीन
यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्।
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ॥ २७ ॥
जे जे कांहीं व्यापार करिसी, कां भोग हन भोगिसी।
अथवा यज्ञीं यजसी, नानाविधीं ॥ ३९८ ॥
नातरी पात्रविशेषें दानें, कां सेवकां देसी जीवनें।
तपादि साधनें, व्रतें करिसी ॥ ३९९ ॥
तें क्रियाजात आघवें, जें जैसें निपजेल स्वभावें।
तें भावना करोनि करावें, माझिया मोहरा ॥ ४०० ॥
परि सर्वथा आपुलां जीवीं, केलियाची शंका कांहींचि नुरवीं।
ऐसीं धुवोनि कर्मे द्यावीं, माझियां हातीं ॥ ४०१ ॥
शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनै:।
संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ॥ २८ ॥
मग अग्निकुंडी बीजें घातलीं, तियें अंकुरदशे जेविं मुकलीं।
तेवि न फळतीचि मज अर्पिलीं, शुभाशुभें ॥ ४०२ ॥
अगा कर्मे जैं उरावें, तैं तिहीं सुखदुःखीं फळावें।
आणि तयातें भोगावया यावें, देहा एका ॥ ४०३ ॥
तें उगाणिलें मज कर्म, तेव्हांचि पुसिलें मरण जन्म।
जन्मासवें श्रम, वरचिलही गेले ॥ ४०४ ॥
उगाणिलें=अर्पण केली
म्हणऊनि अर्जुना यापरि, पाहेचा वेळु नव्हेल भारी,
हे संन्यासयुक्ति सोपारी, दिधली तुज ॥ ४०५ ॥
पाहेचा=पाहण्याचा कळण्याचा भारी=मोठा
या देहाचिया बांदोडी न पडिजे, सुखदुःखाचिया सागरीं न बुडिजे,
सुखें सुखरुपा घडिजे, माझियाचि अंगा ॥ ४०६ ॥
बांदोडी=बंधन
http://dnyaneshwariabhyas.blogspot.in/
अपुर्व !
ReplyDelete