Saturday, May 7, 2016

ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओव्या ४७५ ते ५३५ संपूर्ण






ज्ञानेश्वरी / अध्याय नववा  राजविद्याराजगुह्ययोग  संत ज्ञानेश्वर
ओव्या ४७५ ते ५३५ संपूर्ण
     
किं पुनर्ब्राह्मणा: पुण्या भक्ता राजर्षयस्तथा।
     
अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम् ॥ ३३ ॥

मग वर्णांमाजीं छत्रचामर, स्वर्ग जयांचें अग्रहार।
मंत्रविद्येसि माहेर, ब्राह्मण जे ॥ ४७५ ॥

छत्रचामर=श्रेष्ठ अग्रहार=नजराणा इमान

जेथ अखंड वसिजे यागीं, जे वेदांची वज्रांगी।
जयाचिये दिठीचां उत्संगीं , मंगळ वाढे ॥ ४७६ ॥

वज्रांगी=चिलखत  उत्संगीं=मांडीवर

जे पृथ्वीतळींचे देव, जे तपोवतार सावयव।
सकळ तीर्थांसी दैव, उदयलें जे ॥ ४७७ ॥

जयाचिये आस्थेचिये वोले, सत्कर्म पाल्हाळीं गेलें।
संकल्पें सत्य जियालें, जयांचेनि ॥ ४७८ ॥

पाल्हाळीं=जोपासना करणे

जयांचेनि गा बोलें, अग्नीसि आयुष्या जाहालें ।
म्हणोनि समुद्रें पाणी आपुलें, दिधलें यांचिया प्रीती ॥ ४७९ ॥

मियां लक्ष्मी डावलोनि केली परौती, फेडोनि कौस्तुभ घेतला हातीं,
मग वोढविली वक्षस्थळाची वाखती, चरणरजां ॥ ४८० ॥

वाखती= छातीचा खळग्यात  

आझूनि पाउलांची मुद्रा, मी हृदयीं वाहें गा सुभद्रा।
जे आपुलिया दैवसमुद्रा, जतनेलागीं ॥ ४८१ ॥

दैवसमुद्रा=भाग्य

जयांचा कोप सुभटा, काळाग्निरुद्राचा वसौटा।
जयांचां प्रसादीं फुकटा, जोडती सिद्धी ॥ ४८२ ॥

वसौटा=वसतीस्थान

ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण, आणि माझां ठायीं आर्तिंनिपुण।
आतां मातें पावती हें कवण, समर्थणें ॥ ४८३ ॥

पाहें पां चंदनाचेनि अंगानिळें, शिवतिले निंब होते जे जवळे।
तिंहीं निर्जिवींही देवांची निडळें, बैसणीं केलीं ॥ ४८४ ॥

निर्जिवींही=सुकलेले वृक्ष    निडळें=कपाळी

मग तो चंदनु तेथ न पवे, ऐसें मनीं कैसेनि धरावें।
अथवा पातला हें समर्थावें, तेव्हां कायि साच ॥ ४८५ ॥

न पवे=न पावे ते स्थान  समर्थावें=समर्थन करावे, साच =खरे म्हणावे

जेथ निववील ऐसिया आशा, हरें चंद्रमा आधा ऐसा।
वाहिजत असे शिरसा, निरंतर ॥ ४८६ ॥

हरें=शंकर

तेथ निवविता आणि सगळा, परिमळें चंद्राहूनि आगळा।
तो चंदनु केविं अवलीळा, सर्वांगी न बैसे ॥ ४८७

सगळा=संपूर्णत: अवलीळा=सहज

कां रथ्योदकें जियेचिये कासे, लागलिया समुद्र जालीं अनायासें।
तिये गंगेसि काय अनारिसें, गत्यंतर असे ॥ ४८८ ॥

रथ्योदकें=रस्त्यावरील पाणी(गटार)   अनारिसें=वेगळे

म्हणोनि राजर्षि कां ब्राह्मण, जयां गती मती मीचि शरण।
तयां त्रिशुद्धी मीच निर्वाण, स्थितिही मीचि ॥ ४८९ ॥

यालागीं शतजर्जरे नावे, रिगोनि केविं निश्चिंत होआवें।
कैसेनि उघडिया असावें, शस्त्रवर्षीं ॥ ४९० ॥

नावे=होडी

अंगावरी पडतां पाषाण, न सुवावें केविं वोडण।
रोगें दाटलिया आणि उदासपण, वोखदेंसीं ॥ ४९१ ॥

सुवावें=आवरण घेणे शिरणे   वोडण=ढाल पांघरून

जेथ चहूंकडे जळत वणवा, तेथूनि न निगिजे केविं पांडवा।
तेविं लोका येऊनिया सोपद्रवा, केविं न भजिजे मातें ॥ ४९२ ॥

सोपद्रवा=स उपद्रव , दु:खदायी

अगा मातें न भजावयालागीं, कवण बळ पां आपुलां आंगीं।
काइ घरीं कीं भोगीं, निश्चिंती केली ॥ ४९३ ॥

घराच्या वा भोगाच्या जोरावर बेफिकीर

नातरी विद्या कीं वयसा, यां प्राणियांसि हा ऐसा।
मज न भजतां भरवसां, सुखाचा कोण ॥ ४९४ ॥

तरी भोग्यजात जेतुलें, तें एका देहाचिया निकिया लागलें।
आणि येथ देह तंव असे पडिलें, काळाचां तोंडीं ॥ ४९५ ॥

निकिया=हितास, पोषणा

बाप दुःखाचें केणें सुटलें, जेथ मरणाचे भरे लोटले।
तिये मृत्युलोकींचिये शेवटिले, येणें जाहालें हाटवेळे ॥ ४९६ ॥

दुःखाचा माल आल आहे अन मरणाच्या मापाने मोजला जात आहे
केणें=माल गठ्ठे गोणी हाटवेळे=बाजार

आतां सुखेंसि जीविता, कैची ग्राहिकी कीजेल पांडुसुता।
काय राखोंडी फुंकिता, दीपु लागे ॥ ४९७ ॥

ग्राहिकी=लाभ, खरेदी सुखेंसि जीविता=मृत्युलोकी सुख कैसे

अगा विषाचे कांदे वाटुनी, जो रसु घेइजे पिळुनी।
तया नाम अमृत ठेउनी, जैसें अमर होणें ॥ ४९८ ॥

तेविं विषयांचें जें सुख, तें केवळ परम दुःख।
परि काय कीजे मूर्ख, न सेवितां न सरे ॥ ४९९ ॥

कां शीस खांडूनि आपुलें, पायींचां खतीं बांधिलें।
तैसें मृत्युलोकींचें भलें, आहे आघवें ॥ ५०० ॥

खतीं=जखम

म्हणोनि मृत्युलोकीं सुखाची कहाणी, ऐकिजेल कवणाचां श्रवणीं,
कैंची सुखनिद्रा आंथरुणीं, इंगळाचां ॥ ५०१ ॥

जिये लोकीचा चंद्र क्षयरोगी, जेथ उदयो होय अस्तालागीं।
दुःख लेऊनि सुखाची आंगी, सळित जगातें ॥ ५०२ ॥

आंगी =कपडे सोंग   सळित=छळणे

जेथे मंगळाचां अंकुरीं, सवेंचि अमंगळाची पडे पोरी।
मृत्यु उदराचां परिवरीं, गर्भु गिंवसी ॥ ५०३ ॥

पोरी=कीड   गिंवसी=शोधतो गाठतो

जें नाहीं तयांतें चिंतवी, तंव तेंचि नेइजे गंधर्वीं।
गेलियाची कवणे गांवीं , शुद्धी न लभे ॥ ५०४ ॥

गंधर्वीं=अदृष्य विरून (ढगासारखे )

अगा गिंवसितां आघवा वाटी, परतलें पाउलचि नाहीं किरीटी।
सैंघ निमालियांचियाचि गोठी, तिंये पुराणें जेथिंचीं ॥ ५०५ ॥

गिंवसितां=शोधिता सैंघ=सर्व  निमालियांचियाचि =मेलेल्यांच्या

जेथींचिये अनित्यतेची थोरी, करितया ब्रह्मयाचें आयुष्यवेरी।
कैसें नाहीं होणें अवधारीं, निपटूनियां ॥ ५०६
थोरी=थोरवी वर्णन      निपटूनियां=सर्वथैव टाकून
ऐसी लोकींची जिये नांदणूक, तेथ जन्मले आथि जे लोक।
तयांचिये निश्चिंतीचे कौतुक, दिसत असे ॥ ५०७ ॥

निश्चिंतीचे=काळजी ना करणे कौतुक=नवल

पैं दृष्टादृष्टीचिये जोडी, लागीं भांडवल न सुटे कवडी।
जेथ सर्वस्वें हानि तेथ कोडी, वेंचिती गा ॥ ५०८ ॥

दृष्टादृष्टीचिये=इहपर लोक कोडी=कोटी

जो बहुवें विषयविलासें गुफें, तो म्हणती उवायें पडिला सापें।
जो अभिलाषभारें दडपे, तयातें सज्ञान म्हणती ॥ ५०९ ॥
उवायें=सुखात
सापें=सध्या    दडपे=दाबला जातो

जयाचें आयुष्य धाकुटें होय, बळ प्रज्ञा जिरौनि जाय।
तयाचे नमस्कारिती पाय, वडिल म्हणुनि ॥ ५१० ॥

धाकुटें=कमी

जंव जंव बाळ बळिया वाढे, तंव तंव भोजें नाचती कोडें।
आयुष्य निमालें आंतुलियेकडे, ते ग्लानीचि नाहीं ॥ ५११ ॥

भोजें=आनंदे आंतुलियेकडे=अलीकडे आतून ग्लानी=(इथे )खंत चिंता

जन्मलिया दिवसदिवसें, हों लागे काळाचियाचि ऐसें।
कीं वाढती करिती उल्हासें, उभविती गुढिया ॥ ५१२ ॥

अगा मर हा बोलु न साहती, आणि मेलिया तरी रडती।
परि असतें जात न गणिती, गहिंसपणें ॥ ५१३ ॥

गहिंसपणें=मूर्खपणे अडाणीपणे

दर्दुर सापें गिळिजतु आहे उभा, कीं तो मासिया वेटाळी जिभा।
तैसे प्राणिये कवणा लोभा , वाढविती तृष्णा ॥ ५१४ ॥

अहा कटकटा हें वोखटें, मृत्युलोकींचें उफराटें।
एथ अर्जुना जरी अवचटें, जन्मलासी तूं ॥ ५१५ ॥

कटकटा=अरेरे

वोखटें=वाईट दु:ख 

तरि झडझडोनि वहिला निघ, इये भक्तीचिये वाटे लाग।
जिया पावसी अव्यंग, निजधाम माझें ॥ ५१६ ॥

वहिला= लवकर पहिल्यांदा

     
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु।
     
मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायण: ॥ ३४ ॥

तूं मन हें मीचि करीं, माझां भजनीं प्रेम धरीं।
सर्वत्र नमस्कारीं, मज एकातें ॥ ५१७ ॥

माझेनि अनुसंधानें देख, संकल्पु जाळणें निःशेख।
मद्याजी चोख, याचि नांव ॥ ५१८ ॥

ऐसा मियां आथिला होसी, तेथ माझियाचि स्वरुपा पावसी।
हें अंतःकरणींचें तुजपासीं, बोलिजत असे ॥ ५१९ ॥

अगा आवघिया चोरिया आपुलें, जें सर्वस्व आम्ही असे ठेविलें।
तें पावोनि सुख संचले, होऊनि ठासी ॥ ५२० ॥

चोरिया आपुलें जें सर्वस्व =चोरून ठेवलेले माझे गुज

ऐसें सांवळेनि परब्रह्में, भक्तकामकल्पद्रुमें।
बोलिलें आत्मारामें, संजयो म्हणे ॥ ५२१ ॥

अहो ऐकिजत असे कीं अवधारा, तंव इया बोला निवांत म्हातारा,
 जैसा म्हैसा नुठी कां पुरा, तैसा उगाचि असे ॥ ५२२ ॥

पुरा=पूर पाण्यातून

तेथ संजयें माथा तुकिला, अहा अमृताचा पाऊस वर्षला।
कीं हा एथ असतुचि गेला, सेजिया गांवा ॥ ५२३ ॥

सेजिया=शेजारच्या

तऱ्ही दातारु हा आमुचा, म्हणोनि हें बोलतां मैळेल वाचा।
काइ झालें ययाचा, स्वभावोचि ऐसा ॥ ५२४ ॥

दातारु=अन्नदाता (धृतराष्ट्र)

परि बाप भाग्य माझें, जे वृत्तांतु सांगावयाचेनि व्याजें।
कैसा रक्षिलों मुनिराजें, श्रीव्यासदेवें ॥ ५२५ ॥

येतुलें हें वाडें सायासें, जंव बोलत असे दृढें मानसें।
तंव न धरवेचि आपुलिया ऐसें, सात्विकें केलें ॥ ५२६ ॥

वाडें=प्रचंड

चित्त चाकाटलें आटु घेत, वाचा पांगुळली जेथिंची तेथ,
आपाद कंचुकित, रोमांच आले ॥ ५२७ ॥

चाकाटलें=चकित झाले आटु घेत =आटून शून्याकार होऊ लागले   
कंचुकित= आच्छादले

अर्धोन्मीलित डोळे, वर्षताति आनंदजळें।
आंतुलिया सुखोर्मीचेनि बळें, बाहेरि कांपे ॥ ५२८ ॥

पै आघवांचि रोममूळीं, आली स्वेदकणिका निर्मळी।
लेइला मोतियांचीं कडियाळीं, आवडे तैसा ॥ ५२९ ॥

कडियाळीं=जाळे (जाळीदार अंगरखा)

ऐसा महासुखाचेनि अतिरसे, जेथ आटणी होईल जीवदशे।
तेथे निरोविलें व्यासें, तें नेदीच हों ॥ ५३० ॥

निरोविलें=आज्ञा केले ,सांगितलेले   नेदीच=होऊ न दे

आणि कृष्णार्जुनाचें बोलणें, घों करी आलें श्रवणें।
कीं देहस्मृतीचा तेणें, वापसा केला ॥ ५३१ ॥

घों=घोंगावत

तेव्हां नेत्रींचें जळ विसर्जी, सर्वांगींचा स्वेदु परिमार्जी।
तेवींचि अवधान म्हणे हो जी, धृतराष्ट्रातें।। ५३२ ॥

आतां कृष्णवाक्यबीजा निवाडु, आणि संजय सात्विकाचा बिवडु,
म्हणोनि श्रोतया होईल सुरवाडु, प्रमेयपिकाचा ॥ ५३३ ॥

निवाडु=निवडक बिवडु=सुपीक जमीन सुरवाडु=सुकाळ आनंद

अहो अळुमाळु अवधान देयावें, येतुलेनि आनंदाचे राशीवर बैसावें,
बाप श्रवणेंद्रिया दैवें, घातली माळ ॥ ५३४ ॥

अळुमाळु=हळुवार थोडेसे

म्हणोनि विभूतींचा ठावो, अर्जुना दावील सिद्धांचा रावो।
तो ऐका म्हणे ज्ञानदेवो, निवृत्तीचा ॥ ५३५ ॥
॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्याराजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः ॥
ॐ श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु

1 comment: