अज्ञान पुढे चालू ६९३ ते ७६३
आणि पैं गा धनुर्धरा, जयाचिया अंतरा,
नाहीं वोढावारा, संयमाचा ॥ ६९३ ॥
वोढावारा=आच्छादन बंधन
लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरवंडा,
तैसा निषेधाचिया तोंडा, बिहेना जो ॥ ६९४ ॥
लेंडिये=ओढा वरवंडा=बांध तट
व्रतातें आड मोडी, स्वधर्मु पायें वोलांडी,
नियमाची आस तोडी, जयाची क्रिया ॥ ६९५ ॥
नाहीं पापाचा कंटाळा, नेणें पुण्याचा जिव्हाळा,
लाजेचा पेंडवळा, खाणोनि घाली ॥ ६९६ ॥
पेंडवळा=सीमा मर्यादा
कुळेंसीं जो पाठमोरा, वेदाज्ञेसीं दुऱ्हा,
कृत्याकृत्यव्यापारा, निवाडु नेणे ॥ ६९७ ॥
वसू जैसा मोकाटु, वारा जैसा अफाटु,
फुटला जैसा पाटु, निर्जनीं ॥ ६९८ ॥
वसू=बैल वळू
आंधळें हातिरूं मातलें, कां डोंगरीं जैसें पेटलें,
तैसें विषयीं सुटलें, चित्त जयाचें ॥ ६९९ ॥
हातिरूं=हत्ती
पैं उबधडां काय न पडे, मोकाटु कोणां नातुडे,
ग्रामद्वारींचे आडें, नोलांडी कोण ॥ ७०० ॥
उबधडां=उकिरडा नातुडे =न मिळणे
आडें=वेस उंबरा
जैसें सत्रीं अन्न जालें, कीं सामान्या बीक आलें,
वाणसियेचें उभलें, कोण न रिगे ? ॥ ७०१ ॥
बीक=सामर्थ्य बळ वाणसियेचें= वेश्या उभले= उंबरा
तैसें जयाचें अंतःकरण, तयाच्या ठायीं संपूर्ण,
अज्ञानाची जाण, ऋद्धि आहे ॥ ७०२ ॥
आणि विषयांची गोडी, जो जीतु मेला न संडी,
स्वर्गींही खावया जोडी, येथूनिची ॥ ७०३ ॥
जो अखंड भोगा जचे, जया व्यसन काम्यक्रियेचें,
मुख देखोनि विरक्ताचें, सचैल करी ॥ ७०४ ॥
विषो शिणोनि जाये, परि न शिणे सावधु नोहे,
कुहीला हातीं खाये, कोढी जैसा ॥ ७०५ ॥
कुहीला=कुजलेल्या कोढी=कुष्टी
खरी टेंकों नेदी उडे, लातौनि फोडी नाकाडें,
तऱ्ही जेवीं न काढे, माघौता खरु ॥ ७०६ ॥
खरी=गाढवी
तैसा जो विषयांलागीं, उडी घाली जळतिये आगीं,
व्यसनाची आंगीं, लेणीं मिरवी ॥ ७०७ ॥
फुटोनि पडे तंव, मृग वाढवी हांव,
परी न म्हणे ते माव, रोहिणीची ॥ ७०८ ॥
माव=माया भास
तैसा जन्मोनि मृत्यूवरी, विषयीं त्रासितां बहुतीं परीं,
तऱ्ही त्रासु नेघे धरी, अधिक प्रेम ॥ ७०९ ॥
पहिलिये बाळदशे, आई बा हेंचि पिसें,
तें सरे मग स्त्रीमांसें, भुलोनि ठाके ॥ ७१० ॥
मग स्त्री भोगितां थावों, वृद्धाप्य लागे येवों,
तेव्हां तोचि प्रेमभावो, बाळकांसि आणी ॥ ७११ ॥
थावों=थकणे थांबणे
आंधळें व्यालें जैसें, तैसा बाळें परिवसे,
परि जीवें मरे तों न त्रासे, विषयांसि जो ॥ ७१२ ॥
व्यालें =मुल अपत्य परिवसे=प्रतिपाळी
जाण तयाच्या ठायीं, अज्ञानासि पारु नाहीं,
आतां आणीक कांहीं, चिन्हें सांगों ॥ ७१३ ॥
तरि देह हाचि आत्मा, ऐसेया जो मनोधर्मा,
वळघोनियां कर्मा, आरंभु करी ॥ ७१४ ॥
वळघोनियां=बाळगून
आणि उणें कां पुरें, जें जें कांहीं आचरे,
तयाचेनि आविष्करें, कुंथों लागे ॥ ७१५ ॥
कुंथों लागे=हर्ष शोक दाखवणे
डोईये ठेविलेनि भोजें, देवलविसें जेवीं फुंजे,
तैसा विद्यावयसा माजे, उताणा चाले ॥ ७१६ ॥
भोजें =दैवत देवलविसें=भगत
म्हणे मीचि एकु आथी, माझ्यांचि घरीं संपत्ती,
माझी आचरती रीती, कोणा आहे ॥ ७१७ ॥
नाहीं माझेनि पाडें वाडु, मी सर्वज्ञ एकचि रूढु,
ऐसा गर्वतुष्टीगंडु, घेऊनि ठाके ॥ ७१८ ॥
वाडु=मोठा गंडु=रोग
व्याधि लागलिया माणुसा, नयेचि भोग दाऊं जैसा,
निकें न साहे जो तैसा, पुढिलांचें ॥ ७१९ ॥
निकें=चांगले
पैं गुण तेतुला खाय, स्नेह कीं जाळितु जाय,
जेथ ठेविजे तेथ होय, मसी{ऐ}सें ॥ ७२० ॥
गुण=दोरा स्नेह=तूप मसी=काजळी
जीवनें शिंपिला तिडपिडी, विजिला प्राण सांडीं,
लागला तरी काडी, उरों नेदी ॥ ७२१ ॥
विजिला=वारा घालता
आळुमाळ प्रकाशु करी, तेतुलेनीच उबारा धरी,
तैसिया दीपाचि परी, सुविद्यु जो ॥ ७२२ ॥
औषधाचेनि नांवें अमृतें, जैसा नवज्वरु आंबुथे,
कां विषचि होऊनि परतें, सर्पा दूध ॥ ७२३ ॥
अमृतें =दुध आंबुथे=वाढणे भडकणे
तैसा सद्गुणीं मत्सरु, व्युत्पत्ती अहंकारु,
तपोज्ञानें अपारु, ताठा चढे ॥ ७२४ ॥
व्युत्पत्ती=पांडित्य ज्ञान
अंत्यु राणिवे बैसविला, आरें धारणु गिळिला,
तैसा गर्वें फुगला, देखसी जो ॥ ७२५ ॥
अंत्यु =नीच आरें=अजगर धारणु=पकडले सावज
जो लाटणें ऐसा न लवे, पाथरु तेवीं न द्रवे,
गुणियासि नागवे, फोडसें जैसें ॥ ७२६ ॥
लाटणें=लाकडी लाटणे पाथरु=दगड
गुणियासि=गारुडी नागवे=न आवरणे
फोडसें=साप फुरसे
किंबहुना तयापाशी, अज्ञान आहे वाढीसीं,
हें निकरें गा तुजसीं, बोलत असों ॥ ७२७ ॥
आणीकही धनंजया, जो गृहदेह सामग्रिया,
न देखे कालचेया, जन्मातें गा ॥ ७२८ ॥
कालचेया=मागील
कृतघ्ना उपकारु केला, कां चोरा व्यवहारु दिधला,
निसुगु स्तविला, विसरे जैसा ॥ ७२९ ॥
निसुगु= निर्लज्ज
वोढाळितां लाविलें, तें तैसेंच कान पूंस वोलें,
कीं पुढती वोढाळुं आलें, सुणें जैसें ॥ ७३० ॥
वोढाळितां=उनाड पूंस=शेपूट सुणें=कुत्रे
घरामध्ये घुसते म्हणून कुत्र्याचे शेपूट कापले
ते तसेच रक्ताचे ओले कण शेपूट घेवून घरात घुसते
बेडूक सापाचिया तोंडीं, जातसे सबुडबुडीं,
तो मक्षिकांचिया कोडीं, स्मरेना कांहीं ? ॥ ७३१ ॥
तैसीं नवही द्वारें स्रवती, आंगीं देहाची लुती जिती,
जेणें जाली तें चित्तीं, सलेना जया ॥ ७३२ ॥
लुती=कुष्ट जेणें जाली=ज्या मुळे जन्म झाला
मातेच्या उदरकुहरीं, पचूनि विष्ठेच्या दाथरीं,
जठरीं नवमासवरी, उकडला जो ॥ ७३३ ॥
दाथरीं=ढीग
तें गर्भींची जे व्यथा, कां जें जालें उपजतां,
तें कांहींचि सर्वथा, नाठवी जो ॥ ७३४ ॥
मलमूत्रपंकीं, जे लोळतें बाळ अंकीं,
तें देखोनि जो न थुंकीं, त्रासु नेघे ॥ ७३५ ॥
कालचि ना जन्म गेलें, पाहेचि पुढती आलें,
ऐसें हें कांहीं वाटलें, नाहीं जया ॥ ७३६ ॥
आणि पैं तयाची परी, जीविताची फरारी,
देखोनि जो न करी, मृत्युचिंता ॥ ७३७ ॥
फरारी=भरभराट
जिणेयाचेनि विश्वासें, मृत्यु एक एथ असे,
हें जयाचेनि मानसें, मानिजेना ॥ ७३८ ॥
अल्पोदकींचा मासा, हें नाटे ऐसिया आशा,
न वचेचि कां जैसा, अगाध डोहां ॥ ७३९ ॥
कां गोरीचिया भुली, मृग व्याधा दृष्टी न घाली,
गळु न पाहतां गिळिली, उंडी मीनें ॥ ७४० ॥
गोरीचिया=व्याध गाण
दीपाचिया झगमगा, जाळील हें पतंगा,
नेणवेचि पैं गा, जयापरी ॥ ७४१ ॥
गव्हारु निद्रासुखें, घर जळत असे तें न देखे,
नेणतां जेंवी विखें, रांधिलें अन्न ॥ ७४२ ॥
गव्हारु=अडाणी मूर्ख
तैसा जीविताचेनि मिषें, हा मृत्युचि आला असे,
हें नेणेचि राजसें, सुखें जो गा ॥ ७४३ ॥
शरीरींचीं वाढी, अहोरात्रांची जोडी,
विषयसुखप्रौढी, साचचि मानी ॥ ७४४ ॥
परी बापुडा ऐसें नेणे, जें वेश्येचें सर्वस्व देणें,
तेंचि तें नागवणें, रूप एथ ॥ ७४५ ॥
संवचोराचें साजणें, तेंचि तें प्राण घेणें,
लेपा स्नपन करणें, तोचि नाशु ॥ ७४६ ॥
साजणें =मैत्री लेपा =मृतिकेचे चित्र
स्नपन=स्नान
पांडुरोगें आंग सुटलें, तें तयाचि नांवे खुंटलें,
तैसें नेणें भुललें, आहारनिद्रा ॥ ७४७ ॥
सन्मुख शूला, धांवतया पायें चपळा,
प्रतिपदीं ये जवळा, मृत्यु जेवीं ॥ ७४८ ॥
तेवीं देहा जंव जंव वाढु, जंव जंव दिवसांचा पवाडु,
जंव जंव सुरवाडु, भोगांचा या ॥ ७४९ ॥
सुरवाडु=सुख पावणे
तंव तंव अधिकाधिकें, मरण आयुष्यातें जिंके,
मीठ जेवीं उदकें, घांसिजत असे ॥ ७५० ॥
तैसें जीवित्व जाये, तयास्तव काळु पाहे,
हें हातोहातींचें नव्हे, ठाउकें जया ॥ ७५१ ॥
हातोहातींचें=लगेच लवकर
किंबहुना पांडवा, हा आंगींचा मृत्यु नीच नवा,
न देखे जो मावा। विषयांचिया ॥ ७५२ ॥
मावा=भूल
तो अज्ञानदेशींचा रावो, या बोला महाबाहो।
न पडे गा ठावो, आणिकांचा ॥ ७५३ ॥
आणिकांचा=इतर तुलना
पैं जीविताचेनि तोखें, जैसा कां मृत्यु न देखे,
तैसाचि तारुण्ये पोखें, जरा न गणी ॥ ७५४ ॥
कडाडीं लोटला गाडा, कां शिखरौनि सुटला धोंडा,
तैसा न देखे जो पुढां, वार्धक्य आहे ॥ ७५५ ॥
कां आडवोहळा पाणी आलें, कां जैसे म्हैसयाचें झुंज मातलें,
तैसें तारुण्याचे चढलें, भुररें जया ॥ ७५६ ॥
भुररें=भुरळ
पुष्टि लागे विघरों, कांति पाहे निसरों,
मस्तक आदरीं शिरों-, भागीं कंप ॥ ७५७ ॥
दाढी साउळ धरी, मान हालौनि वारी,
तरी जो करी, मायेचा पैसु ॥ ७५८ ॥
साउळ-=पांढरा पैसु=पसारा
पुढील उरीं आदळे, तंव न देखे जेवीं आंधळें,
कां डोळ्यावरलें निगळे, आळशी तोषें ॥ ७५९ ॥
निगळे=चिकटणे (गळत नाही
तोवर)
तैसें तारुण्य आजिचें, भोगितां वृद्धाप्य पाहेचें,
न देखे तोचि साचें, अज्ञानु गा ॥ ७६० ॥
देखे अक्षमें कुब्जें, कीं विटावूं लागे फुंजें,
परी न म्हणे पाहे माझें, ऐसेंचि भवे ॥ ७६१ ॥
कुब्जें=कुबडा वाकलेला विटावूं=उपहास फुंजें =रागावे
आणि आंगीं वृद्धाप्यतेची, संज्ञा ये मरणाची,
परी जया तारुण्याची, भुली न फिटे ॥ ७६२ ॥
संज्ञा=खुण
तो अज्ञानाचें घर, हें साचचि घे उत्तर,
तेवींचि परियेसीं थोर, चिन्हें आणिक ॥ ७६३ ॥
by डॉ.
विक्रांत तिकोणे
--********************--
***************************
सुंदर !
ReplyDelete