Wednesday, January 4, 2017

ज्ञानेश्वरी / अध्याय १३ ओव्या ७६४ ते ८०४ अज्ञान पुढे चालू



ज्ञानेश्वरी / अध्याय तेरावा / संत ज्ञानेश्वर
अज्ञान पुढे चालू ओव्या ७६४ ते ८०४


तरि वाघाचिये अडवे, एक वेळ आला चरोनि दैवें,
तेणें विश्वासें पुढती धांवे, वसू जैसा ॥ ७६४ ॥

अडवे=रान   पुढती=परत वसू=बैल

कां सर्पघराआंतु, अवचटें ठेवा आणिला स्वस्थु,
येतुलियासाठीं निश्चितु, नास्तिकु होय ॥ ७६५ ॥

अवचटें= अचानक कदाचित

तैसेनि अवचटें हें, एकदोनी वेळां लाहे,
एथ रोग एक आहे, हें मानीना जो ॥ ७६६ ॥

वैरिया नीद आली, आतां द्वंद्वें माझीं सरलीं,
हें मानी तो सपिली, मुकला जेवीं ॥ ७६७ ॥

सपिली=पुत्रपौत्रा सकट

तैसी आहारनिद्रेची उजरी, रोग निवांतु जोंवरी,
तंव जो न करी, व्याधी चिंता ॥ ७६८ ॥

उजरी=योग्य नीट

आणि स्त्रीपुत्रादिमेळें, संपत्ति जंव जंव फळे,
तेणें रजें डोळे, जाती जयाचे ॥ ७६९ ॥

रजें=धूळ (रजोगुणे )

सवेंचि वियोगु पडैल, विळौनी विपत्ति येईल,
हें दुःख पुढील, देखेना जो ॥ ७७० ॥

विळौनी=एक दिवशी

तो अज्ञान गा पांडवा, आणि तोही तोचि जाणावा,
जो इंद्रियें अव्हासवा, चारी एथ ॥ ७७१ ॥
अव्हासवा=वाटेल तशी

वयसेचेनि उवायें, संपत्तीचेनि सावायें,
सेव्यासेव्य जाये, सरकटितु ॥ ७७२ ॥

वयसेचेनि=तारुण्य उवायें,=वाढ  
सावायें,=सहाय्ये सरकटितु=सरसकट घेणे  

न करावें तें करी, असंभाव्य मनीं धरी,
चिंतू नये तें विचारी, जयाची मती ॥ ७७३ ॥

रिघे जेथ न रिघावें, मागे जें न घ्यावें,
स्पर्शे जेथ न लागावें, आंग मन ॥ ७७४ ॥

न जावें तेथ जाये, न पाहावें तें जो पाहे,
न खावें तें खाये, तेवींचि तोषे ॥ ७७५ ॥

न धरावा तो संगु, न लागावें तेथ लागु,
नाचरावा तो मार्गु, आचरे जो ॥ ७७६ ॥

नायकावें तें आइके, न बोलावें तें बके,
परी दोष होतील हें न देखे, प्रवर्ततां ॥ ७७७ ॥

आंगा मनासि रुचावें, येतुलेनि कृत्याकृत्य नाठवें,
जो करणेयाचेनि नांवें, भलतेंचि करी ॥ ७७८ ॥

परि पाप मज होईल, कां नरकयातना येईल,
हें कांहींचि पुढील, देखेना जो ॥ ७७९ ॥

तयाचेनि आंगलगें, अज्ञान जगीं दाटुगें,
जें सज्ञानाही संगें, झोंबों सके ॥ ७८० ॥

आंगलगें=सोबत

परी असो हें आइक, अज्ञान चिन्हें आणिक,
जेणें तुज सम्यक्, जाणवे तें ॥ ७८१ ॥

तरी जयाची प्रीति पुरी, गुंतली देखसी घरीं,
नवगंधकेसरीं, भ्रमरी जैशी ॥ ७८२ ॥

साकरेचिया राशी, बैसली नुठे माशी,
तैसेनि स्त्रीचित्त आवेशीं, जयाचें मन ॥ ७८३ ॥

ठेला बेडूक कुंडीं, मशक गुंतला शेंबुडीं,
जैसा ढोरु सबुडबुडीं, रुतला पंकीं ॥ ७८४ ॥

सबुडबुडीं=खड्डा डबके विहीर आड

तैसें घरींहूनि निघणें, नाहीं जीवें मनें प्राणें,
जया साप होऊनि असणें, भाटीं तियें ॥ ७८५ ॥

भाटीं=पडीक जमीन

प्रियोत्तमाचिया कंठीं, प्रमदा घे आटी,
तैशी जीवेंसी कोंपटी, धरूनि ठाके ॥ ७८६ ॥

आटी,= मिठी  कोंपटी=झोपडी

मधुरसोद्देशें, मधुकर जचे जैसें,
गृहसंगोपन तैसें, करी जो गा ॥ ७८७ ॥

म्हातारपणीं जालें, मा आणिक एक विपाईलें,
तयाचें कां जेतुलें, मातापितरां ॥ ७८८ ॥

विपाईलें,=उपजले

तेतुलेनि पाडें पार्था, घरीं जया प्रेम आस्था,
आणि स्त्रीवांचूनि सर्वथा, जाणेना जो ॥ ७८९ ॥

तैसा स्त्रीदेहीं जो जीवें, पडोनिया सर्वभावें,
कोण मी काय करावें, कांहीं नेणे ॥ ७९० ॥

महापुरुषाचें चित्त, जालिया वस्तुगत,
ठाके व्यवहारजात, जयापरी ॥ ७९१ ॥

 (उपरोधात्मक उपमा वापरली आहे )
ठाके = थांबती  

हानि लाज न देखे, परापवादु नाइके,
जयाचीं इंद्रियें एकमुखें, स्त्रिया केलीं ॥ ७९२ ॥

परापवादु=लोक निंदा

चित्त आराधी स्त्रीयेचें, आणि तियेचेनि छंदें नाचे,
माकड गारुडियाचें, जैसें होय ॥ ७९३ ॥

आपणपेंही शिणवी, इष्टमित्र दुखवी,
मग कवडाचि वाढवी, लोभी जैसा ॥ ७९४ ॥

कवडाचि=एक पैसा (त्यावेळचे चलन)

तैसा दानपुण्यें खांची, गोत्रकुटुंबा वंची,
परी गारी भरी स्त्रियेची, उणी हों नेदी ॥ ७९५ ॥

खांची=काटकसर कमी    वंची=फसवणे
गारी भरी= हौस मौज पुरवणे .सारे देणे  

पूजिती दैवतें जोगावी, गुरूतें बोलें झकवी,
मायबापां दावी, निदारपण ॥ ७९६ ॥

जोगावी,=कसेतरी पूजन    निदारपण=दारिद्र

स्त्रियेच्या तरी विखीं, भोगुसंपत्ती अनेकीं,
आणी वस्तु निकी, जे जे देखे ॥ ७९७ ॥

प्रेमाथिलेनि भक्तें, जैसेनि भजिजे कुळदैवतें,
तैसा एकाग्रचित्तें, स्त्री जो उपासी ॥ ७९८ ॥

साच आणि चोख, तें स्त्रियेसीचि अशेख,
येरांविषयीं जोगावणूक, तेही नाहीं ॥ ७९९ ॥

जोगावणूक=अन्नवस्त्रादि पोषण

इयेतें हन कोणी देखैल, इयेसी वेखासें जाईल,
तरी युगचि बुडैल, ऐसें जया ॥ ८०० ॥

वेखासें=विरोधा जाईल

नायट्यांभेण, न मोडिजे नागांची आण,
तैसी पाळी उणखुण, स्त्रीयेची जो ॥ ८०१ ॥

उणखुण=इच्छा

किंबहुना धनंजया, स्त्रीचि सर्वस्व जया,
आणि तियेचिया जालिया-, लागीं प्रेम ॥ ८०२ ॥

जालिया-, लागीं=झालेली (मुलेबाळे)

आणिकही जें समस्त, तियेचें संपत्तिजात,
तें जीवाहूनि आप्त, मानी जो कां ॥ ८०३ ॥


तो अज्ञानासी मूळ, अज्ञाना त्याचेनि बळ,
हें असो केवळ, तेंचि रूप ॥ ८०४ ॥


by डॉ. विक्रांत तिकोणे 

1 comment: