Wednesday, March 23, 2016

ज्ञानेश्वरी अध्याय 3, ओव्या १७२ ते २७६ संत ज्ञानेश्वर,( समाप्त )



ज्ञानेश्वरी  अध्याय 3,  ओव्या १७२ ते २१८ 

न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसंगिनाम्।
     जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन् ॥ २६ ॥

जें सायासें स्तन्य सेवी, तें पक्वान्नें केवीं जेवी।
म्हणोनि बाळका जैशीं नेदावीं, धनुर्धरा ॥ १७२ ॥

तैशी कर्मीं जया अयोग्यता, तयाप्रति नैष्कर्म्यता।
न प्रगटावी खेळतां, आदिकरूनी ॥ १७३ ॥

तेथें सत्क्रियाचि लावावी, तेचि एकी प्रशंसावी।
नैष्कर्मींही दावावी, आचरोनि ॥ १७४ ॥

तया लोकसंग्रहालागीं, वर्ततां कर्मसंगी।
तो कर्मबंधु आंगी, वाजै ना ॥ १७५ ॥

जैसी बहुरूपियाची रावो राणी, स्त्रीपुरुषभावो नाही मनीं।
परी लोकसंपादणी, तैशीच करिती ॥ १७६ ॥

     प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः।
     अहंकारविमूढात्मा कर्ताहं इति मन्यते ॥ २७ ॥

देखें पुढिलाचें वोझें, जरी आपुला माथां घेईजे।
तरी सांगे कां न दाटिजे, धनुर्धरा ॥ १७७ ॥

दाटिजे=जड होणे दडपणे

तैसी शुभाशुभें कर्में, जिये निफजति प्रकृतिधर्में।
तियें मूर्ख मतिभ्रमें, मी कर्ता म्हणे ॥ १७८ ॥

ऐसा अहंकारादि रूढ, एकदेशी मूढ।
तया हा परमार्थ गूढ, प्रगटावा ना ॥ १७९ ॥

हें असो प्रस्तुत, सांगिजेल तुज हित।
तें अर्जुना देऊनि चित्त, अवधारी पां ॥ १८० ॥

     तत्ववित् तु महाबाहो गुणकर्मविभागयोः।
     गुणाः गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥ २८ ॥

जे तत्वज्ञियांचां ठायीं, तो प्रकृतिभावो नाहीं।
जेथ कर्मजात पाहीं, निपजत असे ॥ १८१ ॥

ते देहाभिमानु सांडुनी, गुणकर्में वोलांडुनी।
साक्षिभूत होऊनी, वर्तती देहीं ॥ १८२ ॥

म्हणूनि शरीरी जरी होती, तरी कर्मबंधा नाकळती।
जैसा कां भूतचेष्टा गभस्ती, घेपवेना ॥ १८३ ॥

गभस्ती=सूर्य

     प्रकृतेर्गुणसंमूढाः सज्जन्ते गुणकर्मसु।
     तानकृत्स्नविदो मन्दान् कृत्स्नविन् न विचालयेत् ॥ २९ ॥

एथ कर्मी तोच लिंपे, जो गुणसंभ्रमें घेपे।
प्रकृतिचेनि आटोपें, वर्ततु असे ॥ १८४ ॥

आटोपें=स्वाधीन

इंद्रियें गुणाधारें, राहाटती निजव्यापारें।
तें परकर्म बलात्कारें, आपादी जो ॥ १८५ ॥

आपादी=स्वीकारी तो

     मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याद्यात्मचेतसा।
     निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगत्ज्वरः ॥ ३० ॥

परी उचिते कर्में आघवीं, तुवा आचरोनि मज अर्पावीं।
परी चित्तवृत्ती न्यासावी, आत्मरूपीं ॥ १८६ ॥

न्यासावी=ठेवावी

हें कर्म मी कर्ता, कां आचरेन या अर्था।
ऐसा अभिमानु झणें चित्ता, रिगो देसी ॥ १८७ ॥

तुवां शरीरपरा नोहावें, कामनाजात सांडावें।
मग अवसरोचित भोगावे, भोग सकळ ॥ १८८ ॥

आतां कोदंड घेऊनि हातीं, आरूढ पां इये रथीं।
देईं आलिंगन वीरवृत्ती, समाधानें ॥ १८९ ॥

जगीं कीर्ती रूढवीं स्वधर्माचा मानु वाढवीं।
इया  भारापासोनि सोडवी, मेदिनी हे ॥ १९० ॥

आतां पार्था निःशंकु होई, या संग्रामा चित्त देईं।
एथ हें वांचूनि कांही, बोलों नये ॥ १९१ ॥

     ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवः।
     श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ॥ ३१ ॥

हें अनुपरोध मत माझें, जिहीं परमादरे स्वीकारिजे।
श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे, धनुर्धरा ॥ १९२ ॥

तेही सकळ कर्मी वर्ततु, जाण पां कर्मरहितु।
म्हणोनि हें निश्चितु, करणीय गा ॥ १९३ ॥

     ये त्वेतत्दभ्यसूयंतो नानुतिष्ठन्ति मे मतम्।
     सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टानचेतसः ॥ ३२ ॥

नातरी प्रकृतिमंतु होऊनी, इंद्रियां लळा देऊनी।
जे हें माझे मत अव्हेरुनी, ओसंडिती ॥ १९४ ॥

ओसंडिती=टाकती

जे सामान्यत्वें लेखिती, अवज्ञा करूनि देखिती।
कां हा अर्थवादु म्हणती, वाचाळपणें ॥ १९५ ॥

अर्थवादु=अतिशोयोक्ती

ते मोहमदिरा भ्रमले, विषयविखें धारले।
अज्ञानपंकी बुडाले, निभ्रांत मानीं ॥ १९६ ॥

देखें शवाचां हातीं दिधलें, जैसे कां रत्न वायां गेलें।
नातरी जात्यंधा पाहलें, प्रमाण नोहे ॥ १९७ ॥

प्रमाण=साक्ष

कां चंद्राचा उदयो जैसा, उपयोगा नवचे वायसा।
मूर्खा विवेकु हा तैसा, रुचेल ना ॥ १९८ ॥
वायसा=कावळा
तैसे ते पार्था, जे विमुख या परमार्था।
तयांसी संभाषण सर्वथा, करावे ना ॥ १९९ ॥

म्हणोनि ते न मानिती, आणि निंदाही करूं लागती।
सांगे पतंग काय साहती, प्रकाशातें ॥ २०० ॥

पतंगा दीपीं आलिंगन, तेथ त्यासी अचूक मरण।
तेवीं विषयाचरण, आत्मघाता ॥ २०१ ॥

     सदृश्यं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि।
     प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ॥ ३३ ॥

म्हणोनि इंद्रिये एकें, जाणतेनि पुरुखें।
लाळावीं ना कौतुकें, आदिकरूनि ॥ २०२ ॥

हां गा सर्पेंसी खेळों येईल, कीं व्याघ्रसंसर्ग सिद्धी जाईल।
सांगे हाळाहाळ जिरेल, सेविलिया ॥ २०३ ॥

हाळाहाळ=विष

देखें खेळतां अग्नि लागला, मग तो न सांवरे जैसा उधवला।
तैसा इंद्रिया लळा दिधला, भला नोहे ॥ २०४ ॥

एऱ्हवी तरी अर्जुना, या शरीरा पराधीना।
कां नाना भोगरचना, मेळवावी ॥ २०५ ॥

आपण सायासेंकरूनि बहुतें, सकळहि समृद्धिजातें।
उदोअस्तु या देहातें, प्रतिपाळावे कां ॥ २०६ ॥

उदोअस्तु=सकल ते संध्याकाळ

सर्वस्वें शिणोनि एथें, अर्जवावीं संपत्तिजातें।
तेणें स्वधर्मु सांडुनी देहातें, पोखावें काई ॥ २०७ ॥

अर्जवावीं=मिळवावी पोखावें=पोषण

मग हें तंव पांचमेळावा, शेखीं अनुसरेल पंचत्वा।
ते वेळीं केला कें गिंवसावा, शीणु आपुला ॥ २०८ ॥

शेखीं=अंती गिंवसावा=शोधावा

म्हणूनि केवळ देहभरण, ते जाणें उघडी नागवण।
यालागी एथ अंतःकरण, देयावें ना ॥ २०९ ॥

नागवण=फसवणूक

     इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ।
     तयोर्न वशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपंथिनौ ॥ ३४ ॥

एऱ्हवीं इंद्रियाचियां अर्था -, सारिखा विषयो पोखितां।
संतोषु कीर चित्ता, आपजेल ॥ २१० ॥

परी तो संवचोराचा संगु, जैसा नावेक स्वस्थु।
जंव नगराचा प्रांतु, सांडिजेना ॥ २११ ॥

संवचोराचा=सभ्य म्हणून सोबत चालणारा चोर

बापा विषाची मधुरता, झणे आवडी उपजे चित्ता।
परी तो परिणाम विचारितां, प्राणु हरी ॥ २१२ ॥

झणे=लगेच

देखें इंद्रियीं कामु असे, तो लावी सुखदुराशे।
जैसा गळीं मीनु आमिषें, भुलविजे गा ॥ २१३ ॥

सुखदुराशे=सुखाची दुराशा

परी तयामाजि गळु आहे, जो प्राणातें घेऊनि जाये।
तो जैसा ठाउवा नोहे, झांकलेपणें ॥ २१४ ॥

तैसें अभिलाषें येणें कीजेल, जरी विषयाची आशा धरीजेल।
तरी वरपडा होईजेल, क्रोधानळा ॥ २१५ ॥

क्रोधानळा=क्रोधाग्नी

जैसा कवळोनियां पारधी, घातेचिये संधी।
आणि मृगातें बुद्धीं, साधावया ॥ २१६ ॥

कवळोनियां =घेरून बुद्धीं=हेतूने साधावया=माराव्यात

एथ तैसीची परी आहे, म्हणूनि संगु हा तुज नोहे।
पार्था दोन्ही कामक्रोध हे, घातुक जाणें ॥ २१७ ॥

म्हणऊनि हा आश्रयोचि न करावा, मनींही आठवो न धरावा।
एकु निजवृत्तीचा वोलावा, नासों नेदीं ॥ २१८ ॥


निजवृत्ती
=आत्मवृत्ती =स्वधर्म 



     श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात्।
     स्वधर्मे निधनम् श्रेयः परधर्मो भयावहः ॥ ३५ ॥

अगा स्वधर्मु हा आपुला, जरि कां कठिणु जाहला।
तरी हाचि अनुष्ठिला, भला देखें ॥ २१९ ॥

येरू आचारु जो परावा, तो देखतां कीर बरवा।
परि आचरतेनि आचरावा, आपुलाचि ॥ २२० ॥

सांगे शूद्रघरीं आघवीं, पक्वाने आहाति बरवीं।
तीं द्विजें केवीं सेवावीं, दुर्बळु जरी जाहला ॥ २२१ ॥

सांगे=पाठ भेद सान्ने =हलके अन्न

हें अनुचित कैसेनि कीजे, अप्राप्य केवीं इच्छिजे।
अथवा इच्छिलेंही पाविजे, विचारीं पां ॥ २२२ ॥

तरी लोकांचीं धवळारें, देखोनियां मनोहरें।
असतीं आपुलीं धवळारें तणारें, मोडावीं केवीं ॥ २२३ ॥

धवळारें=चुने गच्ची घर धवळारें=झोपडी

हें असो वनिता आपुली, कुरुप जरी जाहली।
तरी भोगितां तेचि भली, जियापरी ॥ २२४ ॥

तेवीं आवडे सांकडु, आचरता जरी दुवाडु।
तरी स्वधर्मचि सुरवाडु, पारत्रिकीचा ॥ २२५ ॥

आवडे =वाटतो सांकडु=त्रासदायक दुवाडु =कठीण

हां गा साकर आणि दूध, हें गौल्य कीर प्रसिद्ध।
परी कृमीदोषीं विरुद्ध, घेपें केवीं ॥ २२६ ॥

गौल्य=गोडी

ऐसेनिही जरी सेविजेल, तरी ते आळुकीची उरेल।
जे तें परिणामीं पथ्य नव्हेल, धनुर्धरा ॥ २२७ ॥

आळुकीची=इच्छा आसक्ती

म्हणोनि आणिकांसी जे विहीत, आणि आपणपेयां अनुचित।
तें नाचरावे जरी हित, विचारिजे ॥ २२८ ॥

या स्वधर्मातें अनुष्ठितां, वेचु होईल जीविता।
तोहि निका वर उभयतां, दिसतसे ॥ २२९ ॥
उभयतां=इह परलोकी

ऐसें समस्तसुरशिरोमणी, बोलिले जेथ श्रीशार्ङगपाणी।
तेथ अर्जुन म्हणे विनवणी, असे देवा ॥ २३० ॥

हें जें तुम्हीं सांगितलें, तें सकळ कीर म्यां परिसलें।
परि पुसेन कांही आपुले, अपेक्षित ॥ २३१ ॥

     अर्जुन उवाच: अथ केन प्रयुकोऽयं पापं चरति पूरुषः।
                 अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥ ३६ ॥

तरी देवा हें ऐसें कैसें, जे ज्ञानियांचीही स्थितीही भ्रंशे।
मार्ग सांडुनि अनारिसे, चालत देखों ॥ २३२ ॥

अनारिसे=भलता वेगळा

सर्वज्ञुही जे होती, हे उपायही जाणती।
तेही परधर्में व्यभिचरति, कवणें गुणें ॥ २३३ ॥

बीजा आणि भुसा, अंधु निवाडु नेणे जैसा।
नावेक देखणाही तैसा, बरळे कां पां ॥ २३४ ॥
बरळे=चुकणे

जे असता संगु सांडिती, तेचि संसर्गु करिता न धाती।
वनवासीही सेविती, जनपदातें ॥ २३५ ॥

धाती=समाधान होणे जनपदातें=शहर

आपण तरी लपती, सर्वस्वें पाप चुकविती।
परी बलात्कारे सुइजती, तयाचिमाजी ॥ २३६ ॥

सुइजती=प्रवेशती

जयांची जीवें घेती विवसी, तेचि जडोनि ठाके जीवेंसीं।
चुकविती ते गिंवसी, तयातेंचि ॥ २३७ ॥

विवसी=हडळ गिंवसी=सापडती

सा बलात्कारु एकु दिसे, तो कवणाचा एथ आग्रहो असे।
हें बोलावे हृषिकेशें, पार्थु म्हणे ॥ २३८ ॥

     श्रीभगवानुवाच: काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः।
                  महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥ ३७ ॥

तंव हृदयकमळारामु, जो योगियांचा निष्कामकामु।
तो म्हणतसे पुरुषोत्तमु, सांगेन आइक ॥ २३९ ॥

तरी हे काम क्रोधु पाहीं, जयांते कृपेची साठवण नाहीं।
हें कृतांताचां ठायीं, मानिजती ॥ २४० ॥

कृतांताचां=यम

हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ।
भजनमार्गीचे मांग, मारक जे ॥ २४१ ॥

हे देहदुर्गीचे धोंड, इंद्रियग्रामीचे कोंड।
यांचे व्यामोहादिक बंड, जगामाजि ॥ २४२ ॥

कोंड=कोंडवाडे व्यामोहादिक=संशय मोह

हे रजोगुण मानसीचे, समूळ आसुरियेचे।
धायपण ययांचे, अविद्या केले ॥ २४३ ॥

धायपण=पालन पोषण

हे रजाचे कीर जाहले, परी तमासी पढियंते भले।
तेणें निजपद यां दिधले, प्रमादमोह ॥ २४४ ॥

पढियंते=प्रिय

हे मृत्यूचां नगरीं, मानिजति निकियापरी।
जे जीविताचे वैरी, म्हणऊनियां ॥ २४५ ॥

निकियापरी=खूप चांगले

जयांसि भुकेलियां आमिषा, हें विश्व न पुरेचि घांसा।
कुळवाडी यांची आशा, चाळित असे ॥ २४६ ॥

कुळवाडी=जमीन कसणारे चाळित=चाळवणे

कौतुकें कवळितां मुठीं, जिये चौदा भुवनें थेंकुटीं।
तें भ्रांति तिये धाकुटी, वाल्हीदुल्ही ॥ २४७ ॥

वाल्हीदुल्ही=लाडकी नवसाची बहिण

जे लोकत्रयाचें भातुके, खेळताचि खाय कवतिकें।
तिच्या दासीपणाचेनि बिकें, तृष्णा जिये ॥ २४८ ॥

बिकें=सामर्थ्ये भातुके=खाऊ

हें असो मोहे मानिजे, यांते अहंकार घेपे दीजे।
जेणे जग आपुलेनि भोजें, नाचवित असे ॥ २४९ ॥

मानिजे=मानतो घेपे, दीजे=व्यवहार करणे , भोजें=इच्छेने

जेणें सत्याचा भोकसा काढिला, मग अकृत्य तृणकुटा भरिला।
तो दंभु रूढविला, जगीं इहीं ॥ २५० ॥

भोकसा=कोथळा  तृणकुटा=वाळलेले गवत

साध्वी शांती नागवली, मग माया मांगी शृंगारिली।
तियेकरवी विटाळविली, साधुवृंदे ॥ २५१ ॥

इहीं विवेकाची त्राय फेडिली, वैराग्याची खाल काढिली।
जितया मान मोडिली, उपशमाची ॥ २५२ ॥

त्राय=बळ ,शक्ती उपशमाची=निग्रह

इहीं संतोषवन खांडिले, धैर्यदुर्ग पाडिले।
आनंदरोप सांडिले, उपडूनियां ॥ २५३ ॥

इहीं बोधाची रोपे लुंचिली, सुखाची लिपी पुसली।
जिव्हारीं आगी सूदली, तापत्रयाची ॥ २५४ ॥

लुंचिली=उपटली सूदली=भरली ओतली

हे आंगा तव घडले, जीवींचि आथी जडले।
परी नातुडती गिंवसले, ब्रह्मादिकां ॥ २५५ ॥
नातुडती=अ स्वाधीन, न सापडत

हें चैतन्याचे शेजारी, वसती ज्ञानाचां एका हारीं।
म्हणोनि प्रवर्तले महामारी, सांवरती ना ॥ २५६ ॥

हारीं=पंगतीला सांवरती=सावरले जात नाही

हें जळेंवीण बुडविती, आगीविण जाळिती।
न बोलता कवळिती, प्राणियांते ॥ २५७ ॥

हे शस्त्रेविण साधिती, दोरेविण बांधिती।
ज्ञानियासी तरी वधिती, पैज घेऊनि ॥ २५८ ॥

चिखलेंवीण रोविती, पाशिकेंवीण गोंविती।
हे कवणाजोगे न होती, आंतौटेपणें ॥ २५९ ॥

आंतौटेपणें=आटोक्यात न आणण्या जोगे

     धूमेनाऽव्रियते वन्हिर्यथादर्शो मलेन च।
     येथोल्बेनावृत्तो गर्भस्तथा तेनेदमावृतम् ॥ ३८ ॥

जैसी चंदनाची मुळी, गिंवसोनी घेपे व्याळीं।
ना तरी उल्बाची खोळी, गर्भस्थासी ॥ २६० ॥
गिंवसोनी =कवटाळून व्याळी=सर्प उल्बाची=गर्भाशयाची
कां प्रभावीण भानु, धूमेंवीण हुताशनु।
जैसा दर्पण मळहीनु, कहींच नसे ॥ २६१ ॥

हुताशनु=अग्नी

तैसें इहीविण एकलें, आम्हीं ज्ञान नाही देखिलें।
जैसें कोंडेनि पां गुंतलें, बीज निपजे ॥ २६२ ॥

     आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा।
     कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणतलेन च ॥ ३९ ॥

तैसें ज्ञान तरी शुद्ध, परी इहीं असे प्ररुद्ध।
म्हणोनि तें अगाध, होऊनि ठेलें ॥ २६३ ॥

प्ररुद्ध=झाकले अगाध=कठीण

आधी यांते जिणावें, मग तें ज्ञान पावावें।
तंव पराभवो न संभवे, रागद्वेषां ॥ २६४ ॥

यांते साधावयालागी, जें बळ जाणिजे अंगी।
तें इंधन जैसें आगी, सावावो होय ॥ २६५ ॥

सावावो=मदतनीस

     इंद्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते।
     
एतैरविमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् ॥ ४० ॥

तैसे उपाय कीजती जे जे, ते यांसीचि होती विरजे।
म्हणोनि हटियांते जिणिजे, इहींचि जगीं ॥ २६६ ॥

विरजे=मदत हटियांते=हटयोगी,हट्टी

ऐसियांही सांकडां बोला, एक उपायो आहे आहे भला।
तो करितां जरी आंगवला, तरी सांगेन तुज ॥ २६७ ॥

सांकडां=अवघड गोष्ट

     तस्मात् त्वमिंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ।
     
पाप्मानं प्रहि ह्येनं ज्ञान्विज्ञाननाशनम् ॥ ४१ ॥

यांचा पहिला कुरुठा इंद्रियें, एथूनि प्रवृत्ति कर्मातें वियें।
आधी निर्दळूनि घालीं तियें, सर्वथैव ॥ २६८ ॥

कुरुठा=घर

     इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्यः परं मनः।
     
मनसस्तु परा बुद्धियोर् बुद्धेः परतस्तु सः ॥ ४२ ॥

मग मनाची धांव पारुषेल, आणि बुद्धीची सोडवण होईल।
इतुकेनि थारा मोडेल, या पापियांचा ॥ २६९ ॥

पारुषेल=थांबेल

     एवं बुद्धे परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना।
     
जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् ॥ ४३

हें अंतरीहूनि जरी फिटले, तरी निभ्रांत जाण निवटले।
जैसें रश्मीवीण उरले, मृगजळ नाही ॥ २७० ॥

तैसे रागद्वेष जरी निमाले, तरी ब्रह्मीचें स्वराज्य आलें।
मग तो भोगी सुख आपुलें, आपणचि ॥ २७१ ॥

जे गुरुशिष्यांची गोठी, पदपिंडाची गांठी।
तेथ स्थिर राहोनि नुठीं, कवणे काळीं ॥ २७२ ॥
पदपिंडाची=जीव व परमात्मा


ऐसें सकळ सिद्धांचा रावो, देवी लक्ष्मीयेचा नाहो।
राया ऐक देवदेवो, बोलता जाहला ॥ २७३ ॥

नाहो=पती

आतां पुनरपि तो अनंतु, आद्य एकी मातु।
सांगेल तेथ पंडुसुतु, प्रश्नु करील ॥ २७४ ॥

मातु=गोष्ट

तया बोलाचा हन मातु पाडु, का रसवृत्तीचा निवाडु।
येणें श्रोतयां होईल सुरवाडु, श्रवणसुखाचा ॥ २७५ ॥

 पाडु =सामर्थ्य रसवृत्तीचा =रसाळपणाची  निवाडु=वेचकता सुरवाडु,=आनंद

ज्ञानदेवो म्हणे निवृत्तिचा, चांग उठावा करूनि उन्मेषाचा।
मग संवादु श्रीहरिपार्थाचा, भोग बापा ॥ २७६ ॥
उन्मेषाचा=ज्ञानवृतीचा उठावा=जागवून

॥ अध्याय तिसरा समाप्त ॥

http://dnyaneshwariabhyas.blogspot.in/


ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

1 comment: