ज्ञानेश्वरी / अध्याय चौथा / (संपूर्ण)
ओव्या १७६ ते २२५
यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन।
ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा ॥ ३७ ॥
सांगे भुवनत्रयाची काजळी, जे गगनामाजि उधवली।
तिये प्रळयींचे वाहुटळी, काय अभ्र पुरे ॥ १७६ ॥
उधवली =उधळली वाहुटळी=वादळ अभ्र=ढग
कीं पवनाचेनि कोंपें, पाणियेंचि जो पळिपें।
तो प्रळयानळु दडपे, तृणें काष्ठे काइ ॥ १७७ ॥
कोंपें =रागावे (इथे दुणावणे) पळिपें=पेटवी
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते।
तत् स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति ॥ ३८ ॥
म्हणोनि असे हें न घडे, तें विचारितांचि असंगडे।
पुढती ज्ञानाचेनि पाडें, पवित्र न दिसे ॥ १७८ ॥
असंगडे=विचित्र,विलक्षण
एथ ज्ञान हें उत्तम होये, आणिकही एक तैसें के आहे।
जैसें चैतन्य कां नोहे, दुसरे गा ॥ १७९ ॥
के=काय
या महातेजाचेनि कसें, जरी चोखाळु प्रतिबिंब दिसे।
कां गिंवसिलें गिंवसे, आकाश हें ॥ १८० ॥
कसें=कसला चोखाळु=चोख
गिंवसिलें=कवळणे पकडणे
ना तरी पृथ्वीचेनि पाडें, कांटाळें जरी जोडे।
तरी उपमा ज्ञानी घडे, पंडुकुमरा ॥ १८१ ॥
पाडें= तुलना, समोर कांटाळें=मोजमाप
म्हणूनी बहुतीं परीं पाहतां, पुढतपुढती निर्धारिता।
हे ज्ञानाची पवित्रता, ज्ञानींचि आथि ॥ १८२ ॥
पुढतपुढती=पुन:पुन्हा
जरी अमृताचि चवी निवडिजे, तरी अमृतासारखी म्हणिजे।
तैसें ज्ञान हें उपमिजे, ज्ञानेसींचि ॥ १८३ ॥
उपमिजे=कळणे ,उपजणे
आतां यावरि जे बोलणे, ते वायां वेळु फेडणें।
तंव सांचचि जी हे पार्थु म्हणे, जें बोलत असां ॥ १८४ ॥
परि तेंचि ज्ञान केवीं जाणावें, ऐसें अर्जुनें जंव पुसावें
तंव तें मनोगत देवें, जाणितलें ॥ १८५ ॥
मग म्हणतसे किरीटी, आतां चित्त देयीं गोठी।
सांगेन ज्ञानाचिये भेटी, उपाय तुज ॥ १८६ ॥
श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः।
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥ ३९ ॥
तरी आत्मसुखाचिया गोडिया, विटे जो कां सकळ विषयां।
जयां ठायीं इंद्रियां, मानु नाही ॥ १८७ ॥
मानु=मोठेपण
जो मनाचि चाड न सांगे, जो प्रकृतीचे केलें नेघे।
जो श्रद्धेचेनि संभोगें, सुखिया जाहला ॥ १८८ ॥
चाड=आवड गोडी हौस
तयातेंचि गिंवसित, हें ज्ञान पांवे निश्चित।
जयामाजि अचुंबित, शांति असे ॥ १८९ ॥
तें हृदयीं प्रतिष्ठे, आणि शांतीचा अंकुर फुटे।
मग विस्तार बहु प्रकटे, आत्मबोधाचा ॥ १९० ॥
मग जेऊति वास पाहिजे, तेऊति शांतीचि देखिजे।
तेथ आपपरु नेणिजे, निर्धारितां ॥ १९१ ॥
तयातेंचि गिंवसित, हें ज्ञान पांवे निश्चित।
जयामाजि अचुंबित, शांति असे ॥ १८९ ॥
तें हृदयीं प्रतिष्ठे, आणि शांतीचा अंकुर फुटे।
मग विस्तार बहु प्रकटे, आत्मबोधाचा ॥ १९० ॥
मग जेऊति वास पाहिजे, तेऊति शांतीचि देखिजे।
तेथ आपपरु नेणिजे, निर्धारितां ॥ १९१ ॥
वास= बाजू ,वाट
ऐसा हा उत्तरोत्तरु, ज्ञानबीजाचा विस्तारु।
सांगता असे अपारु, परि असो आतां ॥ १९२ ॥
अज्ञाश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति।
मायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः ॥
ऐकें जया प्राणियाचां ठायीं, इया ज्ञानाची आवडी नाहीं।
तयाचें जियालें म्हणों काई, वरी मरण चांग ॥ १९३ ॥
शून्य जैसें गृह, कां चैतन्येंवीण देह।
तैसें जीवित तें संमोह, ज्ञानहीना ॥ १९४ ॥
संमोह=संभ्रम
अथवा ज्ञान कीर आपु नोहे, परी ते चाड एकी जरी वाहे।
तरी तेथ जिव्हाळा कांही आहे, प्राप्तीचा पैं ॥ १९५ ॥
अथवा ज्ञान कीर आपु नोहे, परी ते चाड एकी जरी वाहे।
तरी तेथ जिव्हाळा कांही आहे, प्राप्तीचा पैं ॥ १९५ ॥
आपु=स्वाधीन चाड=इच्छा जिव्हाळा=शक्यता अपेक्षा
वांचूनि ज्ञानाची गोठी कायसी, परी ते आस्थाही न धरी मानसीं।
तरी तो संशयरूप हुताशीं, पडिला जाण ॥ १९६ ॥
कायसी=कसली हुताशीं=अग्नीत
जे अमृतही परि नावडे, ऐसें सावियाचि आरोचकु जैं पडे।
तैं मरण आले आलें असे फुडें, जाणों ये कीं ॥ १९७ ॥
तैसा विषयसुखें रंजे, जो ज्ञानेंसींचि माजे।
तो संशये अंगीकारिजे, एथ भ्रांति नाहीं ॥ १९८ ॥
माजे=माजून नाकारणे अंगीकारिजे =वेढला जातो
भ्रांति=संशय
मग संशयी जरी पडला, तरी निभ्रांत जाणे नासला।
ति ऐहिकपरत्रा मुकला, सुखासी गा ॥ १९९ ॥
जया काळज्वरु आंगी बाणे, तो शीतोष्णें जैशीं नेणे।
आगी आणि चांदिणें, सरिसेंचि मानी ॥ २०० ॥
काळज्वरु=विषमज्वर
तैसे साच आणि लटिकें, विरुद्ध आणि निकें।
संशयी तो नोळखे, हिताहित ॥ २०१ ॥
हा रात्रिदिवसु पाहीं जैसा, जात्यंधा ठाउवा नाहीं।
तैसे संशयीं असतां काहीं, मना न ये ॥ २०२ ॥
ठाउवा=ठाव
म्हणऊनि संशयाहुनि थोर, आणिक नाही पाप घोर।
हा विनाशाची वागुर, प्राणियासी ॥ २०३ ॥
वागुर=जाळे
येणें कारणे तुवा त्यजावा, आधी हाचि एकु जिणावा।
जो ज्ञानाचिया अभावा-, माजी असे ॥ २०४ ॥
येणें कारणे तुवा त्यजावा, आधी हाचि एकु जिणावा।
जो ज्ञानाचिया अभावा-, माजी असे ॥ २०४ ॥
अभावा=अनुपस्थित ,नसण्या
जैं अज्ञानाचे गडद पडे, तैं हा बहुवस मनीं वाढे।
म्हणोनि सर्वथा मार्गु मोडे, विश्वासाचा ॥ २०५ ॥
गडद=अंधार बहुवस=मोठ्या प्रमाणात
हृदयी हाचि न समाये, बुद्धींते गिंवसूनि ठाये।
तेथ संशयात्मक होये, लोकत्रय ॥ २०६ ॥
योगसंन्यस्तकर्माणि ज्ञानसंछिन्नसंशयम्।
आत्मवंतं न कर्माणि निबध्नन्ति धनंजयः ॥ ४१ ॥
ऐसे जरी थोरावे, तरी उपायें एकें आंगवे।
जरी हाती होय बरवें, ज्ञानखड्ग ॥ २०७ ॥
थोरावे = वाढतो आंगवे=आवरतो
तरी तेणें ज्ञानशस्त्रें तिखटें, निखळु हा निवटे।
मग निःशेष खता फिटे, मानसींचा ॥ २०८ ॥
निखळु=निश्चित निवटे=नष्ट होतो खता =मळ
तस्मादज्ञानसंभूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः।
छित्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ॥ ४२ ॥
याकारणे पार्था, उठीं वेगीं वरौता।
नाशु करोनि हृदयस्था, संशयासी ॥ २०९ ॥
ऐसे सर्वज्ञानाचा बापु, जो कृष्ण ज्ञानदीपु।
तो म्हणतसे सकृपु, ऐकें राया ॥ २१० ॥
तंव या पूर्वापर बोलाचा, विचारुनि कुमरु पंडूचा।
कैसा प्रश्नु हन अवसरींचा, करिता होईल ॥ २११ ॥
ते कथेची संगति, भावाची संपत्ति।
रसाचि उन्नति, म्हणिपेल पुढां ॥ २१२ ॥
जयाचिया बरवेपणीं, कीजे आठां रसांची ओवाळणी।
सज्जनाचिये आयणी, विसांवा जगी ॥ २१३ ॥
आयणी=बुद्धीस
तो शांतुचि अभिनवेल, ते परियेसा मऱ्हाठे बोल।
जे समुद्राहूनि खोल, अर्थभरित ॥ २१४ ॥
अभिनवेल= तेजाने प्रकटेल (अपूर्व दिसेल )
जैसें बिंब तरी बचकें एवढें, परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडें।
शब्दाची व्याप्ती तेणें पाडें, अनुभवावी ॥ २१५ ॥
बचकें=मुठभर
ना तरी कामितयाचिया इच्छा, फळे कल्पवृक्षु जैसा।
बोल व्यापकु होय तैसा, तरी अवधान द्यावे ॥२१६ ॥
हें असो काय म्हणावें, सर्वज्ञु जाणतीं स्वभावें।
तरी निकें चित्त द्यावें, हें विनंती माझी ॥ २१७ ॥
जेथ साहित्य आणि शांति, हे रेखा दिसे बोलती।
जैसी लावण्यगुणकुळवती, आणि पतिव्रता ॥२१८ ॥
आधींचि साखर आवडे, आणि तेचि जरी ओखदीं जोडे।
तरी सेवावी ना कां कोडें, नावानावा ॥ २१९ ॥
ओखदीं=औषधी नावानावा=वारंवार
सहजे मलयानिळु मंद सुगंधु, तया अमृताचा होय स्वादु।
आणि तेथेंचि जोडे नादु, जरी दैवगत्या ॥ २२० ॥
तरी स्पर्शें सर्वांग निववी, स्वादें जिव्हेतें नाचवी।
तेवीचि कानाकरवीं, म्हणवी बापु माझा ॥ २२१ ॥
बापु माझा= (धन्य उद्गार )फार छान
तैसे कथेचें इये ऐकणें, एक श्रवणासि होय पारणें।
मग संसारदुःख मूळवणें, विकृतीविणें ॥ २२२ ॥
तैसे कथेचें इये ऐकणें, एक श्रवणासि होय पारणें।
मग संसारदुःख मूळवणें, विकृतीविणें ॥ २२२ ॥
मूळवणें=समूळ उच्चाटन विकृतीविणें= त्रासाविन
जरी मंत्रेचि वैरी मरे, तरी वायांचि कां बांधावीं कटारें।
रोग जाये दुधें साखरे, तरी निंब कां पियावा ॥ २२३ ॥
कटारें=शस्त्र कट्यार
तैसा मनाचा मारु न करितां, आणि इंद्रियां दुःख न देतां।
एथ मोक्षु असे आयता, श्रवणाचिमाजी ॥ २२४ ॥
म्हणोनि आथिलिया आराणुका, गीतार्थु हा निका।
ज्ञानदेवो म्हणे आइका, निवृत्तीदासु ॥ २२५ ॥
आथिलिया =असता आराणुका=समाधान प्रसन्नता
निका=चांगला
||चतुर्थाध्याय
संपूर्ण ||
http://dnyaneshwariabhyas.blogspot.in/
सुंदर!
ReplyDelete