Saturday, March 26, 2016

ज्ञानेश्वरी / अध्याय ४ ओव्या ५८ ते ९२


ज्ञानेश्वरी / अध्याय चौथा / संत ज्ञानेश्वर

 =============================================================
     जन्म कर्म च ने दिव्यमेवं यो वेत्ति तत्वतः।
     त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥ ९ ॥

माझे अजत्वें जन्मणें, अक्रियताचि कर्म करणें।
हें अविकार जो जाणे, तो परममुक्त ॥ ५८ ॥

अजत्वें=अजन्मा अविकार=विकार नसलेला

तो चालिला संगे न चळे, देहींचा देहा नाकळे।
मग पंचत्वीं तंव मिळे, माझांचि रूपीं ॥ ५९ ॥

संगे=बरोबरी असलेल्या गोष्टीनी . पंचत्वीं=मरण पावणे

     वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः।
     बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ॥ १० ॥

एऱ्हवी परापर न शोचिती, जे कामनाशून्य होती।
वाटा केवेळीं न वचती, क्रोधाचिया ॥ ६० ॥

परापर= स्वर्ग नरक (इहपरलोक)   शोचिती=दु:ख करणे

जे सदा मियांचि आथिले, माझिया सेवा जियाले।
कां आत्मबोधे तोषले, वीतराग जे ॥ ६१ ॥

मियांचि=माझ्यात  आथिले=असतात


जे तपोतेजाचिया राशी, कां एकायतन ज्ञानासी।
जे पवित्रता तीर्थांसी, तीर्थरूप ॥ ६२ ॥

एकायतन=घर

ते मद्भावा सहजें आले, मी तेचि ते होऊनि ठेले।
जे मज तयां उरले, पदर नाहीं ॥ ६३ ॥
पदर  = अंतर

सांगे पितळेची गंधिकाळिक, जे फिटली होय निःशेख।
तैं सुवर्ण काई आणिक, जोडूं जाईजे ॥ ६४ ॥

गंधिकाळिक= गंज व काळीमा

तैसे यमनियमीं कडसले, ते तपोज्ञानीं चोखळले।
मी तेचि ते जाहले, एथ संशयो कायसा ॥ ६५ ॥

कडसले = कसा उतरले     चोखळले=चोख झाले

     ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्।
     मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ ११ ॥

एऱ्हवी  तरी पाहीं, जे जैसे माझां ठाईं।
भजती तया मीही, तैसाचि भजे ॥ ६६ ॥

देखें मनुष्यजात सकळ, हें स्वभावता भजनशीळ।
जाहलें असे केवळ, माझां ठायीं ॥ ६७ ॥

परी ज्ञानेंवीण नाशिले, जे बुद्धिभेदासि आले।
तेणेंचि त्या कल्पिलें, अनेकत्व ॥ ६८ ॥

म्हणौनी अभेदीं भेदु देखती, यया अनाम्या नामें ठेविती ॥
देवी देवो म्हणती, अचर्चातें ॥ ६९ ॥

अचर्चातें=ज्या विषयी चर्चा(बोलणे ) होऊ शकत नाही

जें सर्वत्र सदा सम, तेथे विभाग अधमोत्तम।
मतिवशें संभ्रम, विवंचिती ॥ ७० ॥

विवंचिती=चिंता करती

     काङक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः।
     क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ॥ १२ ॥

मग नानाहेतुप्रकारें, यथोचितें उपचारें।
मानिलीं देवतांतरें, उपासिती ॥ ७१ ॥

तेथ जें जें अपेक्षित, तें तैसेंचि पावति समस्त।
परी ते कर्मफळ निश्चित, वोळख तूं ॥ ७२ ॥

वाचूंनि देतें घेतें आणिक, निभ्रांत नाही सम्यक।
एथ कर्मचि फळसूचक, मनुष्यलोकीं ॥ ७३ ॥

सम्यक=चंगले

जैसें क्षेत्रीं जें पेरिजे, तें वांचूनि आन न निपजे।
कां पाहिजे तेंचि देखिजे, दर्पणाधारें ॥ ७४ ॥

ना तरी कडेयातळवटीं, जैसा आपुलाचि बोलु किरीटी।
पडिसादु होऊनि उठी, निमित्तयोगें ॥ ७५ ॥

तैसा समस्तां यां भजनां, मी साक्षिभूतु पैं अर्जुना।
एथ प्रतिफळे भावना, आपुलाली ॥ ७६ ॥

     चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः।
     तस्य कर्तारमपि मां विध्यकर्तारमव्यम् ॥ १३ ॥

आतां याचिपरी जाण, चाऱ्ही आहेती हे वर्ण।
सृजिले म्यां गुण -, कर्मभागें ॥ ७७ ॥

जे प्रकृतीचेनि आधारें, गुणाचेनि व्यभिचारें।
कर्में तदनुसारें, विवंचिली ॥ ७८ ॥

व्यभिचारें=वेगळेपण विवंचिली=विवरली

एथ एकचि हे धनुष्यपाणी, परीं जाहले गा चहूं वर्णीं।
ऐसी गुणकर्मीं कडसणी, केली सहजें ॥ ७९ ॥

कडसणी=निवड

म्हणोनि आईकें पार्था, हे वर्णभेदसंस्था।
मी कर्ता नव्हे सर्वथा, याचिलागीं ॥ ८० ॥

     न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा।
     इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥ १४ ॥

हें मजचिस्तव जाहलें, परी म्यां नाहीं केलें।
ऐसे जेणे जाणितलें, तो सुटला गा ॥ ८१ ॥

मजचिस्तव=माझ्यामुळे

     एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वेरपि मुमुक्षुभिः।
     कुरु कर्मेव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम् ॥ १५ ॥

मागील मुमुक्षु जे होते, तिहीं ऐशियाचि जाणोनि मातें।
कर्मे केलीं समस्तें, धर्नुधरा ॥ ८२ ॥

परी तें बीजें जैसीं दग्धलीं, नुगवतीचि पेरलीं।
तैशीं कर्मेंचि परि तयां जाहली, मोक्षहेतु ॥ ८३ ॥

एथ आणिकही एक अर्जुना, हे कर्माकर्मविवंचना।
आपुलिये चाडे सज्ञाना, योग्य नोहे ॥ ८४ ॥

चाडे=आवड, मर्जी

     किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः।
     तत् ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥ १६ ॥

र्म म्हणिजे तें कवण, अथवा अकर्मा काय लक्षण।
ऐसें विचारितां विचक्षण, गुंफोनि ठेले ॥ ८५ ॥

विचक्षण=चिकित्सक गुंफोनि=घोटाळ्यात पडून

जैसें का कुडें नाणें, ऱ्याचेनि सारखेपणें।
डोळ्यांचेहि देखणें, संशयी घाली ॥ ८६ ॥

कुडें=खोटे

तैसे नैष्कर्म्यतेचेनि भ्रमें, गिंवसिजत आहाति कर्में।
जे दुजी सृष्टि मनोधर्में, करूं शकती ॥ ८७ ॥

वाचूनि मूर्खाची गोठी कायसी, एथ मोहले गा क्रांतदर्शी।
म्हणोनि आतां तेचि परियेसीं, सांगेन तुज ॥ ८८ ॥
 
     कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः।
     अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः ॥ १७ ॥

तरी कर्म म्हणजे स्वभावें, जेथ विश्वाकारु संभवे।
ते सम्यक आधीं जाणावें, लागे एथ ॥ ८९ ॥

मग वर्णाश्रमासि उचित, जे विशेष कर्म विहित।
तेंही वोळखावें निश्चित, उपयोगेंसीं ॥ ९० ॥

पाठीं जें निषिद्ध म्हणिपे, तेंही बुझावें स्वरूपें।
येतुलेनि येथ कांही न गुंफे, आपैसेंचि ॥ ९१ ॥

बुझावें=समजून घ्यावे गुंफे=समजणे जाणणे

एऱ्हवी  जग हें कर्माधीन, ऐसी याची व्याप्ती गहन।
परि तें असो आइकें चिन्ह, प्राप्ताचें गा ॥ ९२ ॥


=====================
=====
===========================

2 comments:

  1. मा. वेब-साईट-कार ,
    आपला उपक्रम स्तुत्य आहे यात शंका नाही. पण विषय एव्हढा गहन आहे की निव्वळ शब्दांचे अर्थ देऊन तो समजतोच असे नाही. थोड्या निरूपणाचीही गरज आहे!
    धन्यवाद!

    ReplyDelete