Friday, March 25, 2016

ज्ञानेश्वरी अध्याय ४ ओव्या १ ते ५७




ज्ञानेश्वरी / अध्याय चौथा / संत ज्ञानेश्वर

आजि श्रवणेंद्रिया पिकलें, जे येणें गीतानिधान देखिलें।
आता स्वप्नचि हें तुकलें, साचासरिसें ॥ १ ॥

पिकलें= योग्यतेला आले  (पाठ भेद =पाहिले ) तुकलें=बरोबरी झाले
साचा=सत्य (जागृती)

आधी विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी।
आणि भक्तराजु किरीटी, परिसत असे ॥ २ ॥

गोठी=गोष्ट परिसत=ऐकत

जैसा पंचमालापु सुगंधु, कीं परिमळ आणि सुस्वादु।
तैसा भला जाहला विनोदु, कथेचा इये ॥ ३ ॥

पंचमालापु=पाचवा आलाप “प “ परिमळ=सुगंध
विनोदु,=आनंद

कैसी आगळिक दैवाची, जे गंगा वोळली अमृताची।
हो कां जपतपें श्रोतयांची, फळा आली ॥ ४ ॥

आतां इंद्रियजात आघवें, तिहीं श्रवणाचे घर रिघावें।
मग संवादसुख भोगावें, गीताख्य हें ॥ ५ ॥

हा अतिसो अतिप्रसंगे, सांडूनि कथाचि ते सांगे।
जे कृष्णार्जुन दोघे, बोलत होते ॥ ६ ॥

अतिसो अतिप्रसंगे=अप्रासंगिक पाल्हाळ

ते वेळी संजयों रायातें म्हणे, अर्जुन अधिष्ठिला दैवगुणें।
जे अतिप्रीती नारायणें, बोलिजतु असे ॥ ७ ॥

जें न संगेचि पितया वसुदेवासी, जें न संगे माते देवकीसी।
जें न संगेचि बळिभद्रासी, तें गुह्य अर्जुनेंसी बोलत ॥ ८ ॥

देवी लक्ष्मीयेवढी जवळीक, तेही न देखे या प्रेमाचे सुख।
आणि कृष्णस्नेहाचें पि, यांतेचि आथी ॥ ९ ॥
पिक =(पाठ भेद= बि)=बळ

सनकादिकांच्या आशा, वाढिनल्या होत्या कीर बहुवसा।
परी त्याही येणें माने यशा, येतीचिना ॥ १० ॥

या जगदीश्वराचें प्रेम, एथ दिसतसे निरुपम।
कैसें पार्थें येणें सर्वोत्तम, पुण्य केलें ॥ ११ ॥

हो कां जयाचिया प्रीती, अमूर्त हा आला व्यक्ती।
मज एकवंकी याची स्थिती, आवडतु असे ॥ १२ ॥

एकवंकी=एकरूपता

ऱ्हवीं हा योगिया नाडळे, वेदार्थासी नाकळे।
जेथ ध्यानाचेही डोळे, पावतीना ॥ १३ ॥

तें हा निजस्वरूप, अनादि निष्कंप।
परी येणे मानें सकृप, जाहला असे ॥ १४ ॥

हा त्रैलोक्यपटाचि घडी, आकाराची पैलथडी।
कैसा याचिये आवडी, आवरला असे ॥ १५ ॥

आवडी=प्रेम

     श्रीभगनानुवाच: इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम्।
                 विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ॥ १ ॥

मग देव म्हणे अगा पंडुसुता, हाचि योगु आम्हीं विवस्वता।
कथिला परी ते वार्ता, बहुवां दिवसांची ॥ १६ ॥

विवस्वता=सूर्य

मग तेणें विवस्वतें रवी, हे योगस्थिति आघवी।
निरूपिली बरवी, मनूप्रती ॥ १७ ॥

मनूनें आपण अनुष्ठिली, मग इक्ष्वाकुवा उपदेशिली।
ऐसी परंपरा विस्तारिली, आद्य हे गा ॥ १८ ॥

     एवं परंपराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः।
     स कालेनेह महता योगो नष्टः परंतप ॥ २ ॥

मग आणिकही या योगाते, राजर्षि जाहले जाणते।
परी तेथोनि आतां सांप्रतें, नेणिजे कोणी ॥ १९ ॥

सांप्रतें,=सध्या

जे प्राणियां कामी भरू, देहाचिवरी आदरु।
म्हणोनि पडला विसरु, आत्मबोधाचा ॥ २० ॥

अव्हांटलिया आस्थाबुद्धि, विषयसुखचि परमावधि।
जीवु तैसा उपाधि, आवडे लोकां ॥ २१ ॥

अव्हांटलिया=आडमार्गा जाणे उपाधि=प्रपंच

एऱ्हवी  तरी खवणेयांच्या गांवीं, पाटाऊवें काय करावीं।
सांगे जात्यंधा रवी, काय आथी ॥ २२ ॥

खवणेयांच्या=दिगंबर नग्न पाटाऊवें=वस्त्रे कपडे

कां बहिरयांचां आस्थानीं, कवणे गीतातें मानी।
कीं कोल्हेया चांदणीं, आवडी उपजे ॥ २३ ॥

आस्थानीं-घरी ,ठिकाणी

पैं चंद्रोदया आरौतें, जयांचे डोळे फुटती असते।
ते काऊळे केवीं चंद्रातें, ओळखती ॥ २४ ॥

आरौतें=अगोदर

तैसे वैराग्याची शिंव न देखती, जे विवेकाची भाषा नेणती।
ते मूर्ख केंवीं पावती, मज ईश्वराते ॥ २५ ॥

शिंव =सीमा

कैसा नेणों मोहो वाढीनला, तेणें बहुतेक काळु व्यर्थ गेला।
म्हणोनि योगु हा लोपला, लोकीं इये ॥ २६ ॥

     स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः।
     भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् ॥ ३ ॥

तोचि हा आजि आतां, तुजप्रती कुंतीसुता।
सांगितला आम्हीं तत्वता, भ्रांति न करीं ॥ २७ ॥

तत्वता,=नीट विस्ताराने

हें जीवींचे निज गुज, परी केवीं राखों तुज।
जे पढियेसी तूं मज, म्हणऊनियां ॥ २८ ॥

पढियेसी=प्रिय

तूं प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा।
मैत्रियेची चित्कळा, धनुर्धरा ॥ २९ ॥
चित्कळा=जीवनकळा

तूं अनुसंगाचा ठावो, आतां तुज काय अनुसंगाचा वंचूं जावों।
जरी संग्रामारूढ आहों, जाहलों आम्ही ॥ ३० ॥

अनुसंगाचा=निकट संबध  वंचूं= न देणे

तरी नावेक हें सहावें, गाजाबज्यही न धरावें।
परी तुझें अज्ञानत्व हरावें, लागे आधीं ॥ ३१ ॥

नावेक =क्षणभर गाजाबज्यही=गोंधळ

     अर्जुन उवाच: अपरं भवतो जन्मं परं जन्म विवस्वतः।
                कथमेतद् विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति ॥ ४ ॥

तंव अर्जुन म्हणे हरी, माय आपुलेयाचा स्नेहो करी।
एथ विस्मो काय अवधारीं, कृपानिधी ॥ ३२ ॥

तूं संसारश्रांतांची साऊली, अनाथ जीवांची माऊली।
आमुतें कीर प्रसवली, तुझीच कृपा ॥ ३३ ॥

देवा पांगुळ एकादें विईजे, तरी जन्मोनि जोजारू साहिजे।
हें बोलों काय तुझें, तुजचि पुढां ॥ ३४ ॥

विईजे =जन्मावे जोजारू= बोजा त्रास

आतां पुसेन जें मी कांही, तेथ निकें चित्त देईं।
तेवींचि देवें कोपावें ना कांही, बोला एका ॥ ३५ ॥

तरी मागील जे वार्ता, तुवां सांगितली होती अनंता।
ते नावेक मज चित्ता, मानेचिना ॥ ३६ ॥

जे तो विवस्वतु म्हणजे कायी, ऐसें हें वडिलां ठाऊवें नाहीं।
तरी तुवांचि केवीं पाहीं, उपदेशिला ॥ ३७ ॥

तो तरी आइकिजे बहुतां काळांचा, आणि तूं तंव कृष्ण सांपेचा।
म्हणोनि गा इये मातुचा, विसंवादु ॥ ३८ ॥

सांपेचा=सध्याचा वर्तमानातला

तेवींचि देवा चरित्र तुझें, आपण कांही काय जाणिजे।
हें लटिके केवीं म्हणिजे, एकिहेळां ॥ ३९ ॥

लटिके =खोटे एकिहेळां =एकदम

परी हेचि मातु आघवी, मी परियेसें तैशी सांगावी।
जे तुवांचि तया रवीं केवीं, उपदेशु केला ॥ ४० ॥

परियेसें= ऐकेल (कळेल अशी सांग)

     श्री भगवानुवाच: बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन।
                  तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप ॥ ५ ॥

तंव कृष्ण म्हणे पंडुसुता, तो विवस्वतु जैं होता।
तैं आम्ही नसों ऐसी चित्ता, भ्रांति जरी तुज ॥ ४१ ॥

तरी तूं गा हें नेणसी, पैं जन्में आम्हां तुम्हांसी।
बहुतें गेलीं परी तियें न स्मरसी, आपली तूं ॥ ४२ ॥

मी जेणें जेणें अवसरें, जें जें होऊनि अवतरें।
ते समस्तही स्मरें, धनुर्धरा ॥ ४३ ॥

     अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतामामिश्वरोऽपि सन्।
     प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया ॥ ६ ॥

म्हणोनि आघवें, मज मागील आठवें।
मी अजुही परि संभवे, प्रकृतिसंगे ॥ ४४ ॥

अजुही=अज=आजन्मा

माझें अव्ययत्व तरी न नसे, परी होणें जाणें एक दिसे।
ते प्रतिबिंबे मायावशें, माझांचि ठायीं ॥ ४५ ॥

नसे=नष्ट होणे

माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परी कर्माधीनु ऐसा आवडे।
तेंही भ्रांतिबुद्धि तरी घडे, एऱ्हवी नाहीं ॥ ४६ ॥

कीं एकचि दिसे दुसरें, तें दर्पणाचेनि आधारें।
एऱ्हवी  काय वस्तुविचारें, दुजें आहे ॥ ४७ ॥

तैसा अमूर्तचि मी किरीटी, परी प्रकृति जैं अधिष्ठीं।
तैं साकारपणे नटें नटीं, कार्यालागीं ॥ ४८ ॥

     यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
     अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ ७ ॥

जे धर्मजात आघवे ,युगायुगी म्यां रक्षावे |
ऐसा ओघु हा स्वभावे ,आद्यु असे  ॥ ४९ ॥

 
म्हणौनी अजत्वपरते ठेवी ,मी अव्यक्तपणही नाठवी  
जे वेळी धर्माते अभिभवी ,अधर्मु हा ॥ ५० ॥

अभिभवी=भारी होतो , हून प्रबळ होतो  

  
     परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।
     धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥ ८ ॥

ते वेळी आपुल्याचेनि कैवारें, मी साकारु होऊनि अवतरें।
मग अज्ञानाचें आंधारें, गिळूनि घालीं ॥ ५१ ॥

कैवारें-बाजू घेणे

अधर्माचि अवधी तोडीं, दोषांचीं लिहिलीं फाडीं।
सज्जनांकरवी गुढी, सुखाची उभवीं ॥ ५२ ॥

अवधी=मर्यादा  लिहिलीं=सनद ,करार

दैत्यांचीं कुळें नाशीं, साधूंचा मानू गिंवशीं।
धर्मासी नीतीशी, शेंज भरी ॥ ५३ ॥

शेंज=पा.भे.शेस= सांगड

मी अविवेकाची काजळी, फेडूनी विवेकदीप उजळीं।
तैं योगियां पाहे दिवाळी, निरंतर ॥ ५४ ॥

स्वसुखे विश्व कोंदे, धर्मचि जगीं नांदे।
भक्तां निघती दोंदें, सात्विकाचीं ॥ ५५ ॥

दोंदें=पोट

तैं पापाचा अचळु फिटे, पुण्याची पहाट फुटे।
जैं मूर्ति माझी प्रगटे, पंडुकुमरा ॥ ५६ ॥

अचळु=पर्वत

ऐसेया काजालागी, अवतरें मी युगीं युगीं।
परि हेंचि वोळखे जो जगीं, तो विवेकिया ॥ ५७ ॥

2 comments: